Sindhu Annachhatra through the initiative of Mother's Day Vikhe Patil | Sarkarnama

मातृदिनी विखे पाटील यांच्या पुढाकारातून `सिंधू अन्नछत्र`सुरू

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 मे 2020

पहिल्याच दिवशी पंचवीस हजार गरजूंनी या उपक्रमाच्या माध्यमातून अन्नपाकीटांचा लाभ घेतला. त्यात लापशी व मसालेभाताचा समावेश होता. प्रत्येक अन्नपाकीटासाठी पाच रुपये शुल्क आकारण्यात आले.

शिर्डी : शिर्डी विधानसभा मतदारसंघातील गरजूंसाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून आजपासून `सिंधू अन्नछत्र` हा उपक्रम सुरू करण्यात आला.

पहिल्याच दिवशी पंचवीस हजार गरजूंनी या उपक्रमाच्या माध्यमातून अन्नपाकीटांचा लाभ घेतला. त्यात लापशी व मसालेभाताचा समावेश होता. प्रत्येक अन्नपाकीटासाठी पाच रुपये शुल्क आकारण्यात आले. ही रक्कम मुख्यमंत्री व पंतप्रधाननिधीत जमा केली जाईल. राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे. त्यासाठी मतदार संघातील प्रत्येक गावात यंत्रणा उभी करण्यात आली.

आदल्या दिवशी गरजूंनी नावनोंदणी करायची. त्यानुसार त्या गावात अन्नपाकिटे पोच केली जातात. ती वितरित करण्यापूर्वी गरजूंनी प्रत्येक अन्नपाकीटामागे पाच रुपये शुल्क भरायचे. टोकन घेऊन आपले अन्नपाकिटे घेऊन जायचे. प्रत्येक व्यक्तीला दोन पाकिटे दिली जातात. त्यामुळे अन्नाची नासाडी टळते व ते गरजूपर्यंत जाते. 

बाजार समितीच्या आवारात स्वयंपाक केला जातो. प्रत्येकी दोनशे ग्रॅम वजनाची अन्नपाकिटे तयार केली जातात. प्लॅस्टिकच्या कॅरेटमध्ये ठेवून ही पाकिटे वहानांमार्फत सकाळी अकराच्या सुमारास मतदारसंघातील प्रत्येक गावात पोहच होतात. आदल्या दिवशी नोंदणी केली जात असल्याने नेमका किती स्वयंपाक करायचा, याचा अंदाज येतो. हा उपक्रम सुरू करण्यापूर्वी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या उपस्थीतीत त्याचे नियोजन करण्यात आले. पाचशेहून अधिक कार्यकर्ते व कर्मचारी या अन्नपाकीट वितरण व्यवस्थेत कार्यरत आहेत. अन्नपाकिटांची रोज मागणी वाढत जाईल. हे लक्षात घेऊन तयारी करण्यात आली आहे. बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, उपसभापती वाल्मिक गोर्डे, सचिव उध्दव देवकर व संचालक मंडळातील सदस्य या वेळी उपस्थित होते.

आईच्या नावे उपक्रम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या शेकडो कुटुंबांची चरितार्थ चालविण्याची पंचाईत झाली आहे. त्यांच्यासाठी हा उपक्रम सुरू केला. लॉकडाऊन सुरू असेपर्यत हा उपक्रम सुरू राहील. दिवंगत मातोश्री सिंधूताई यांचे नाव या उपक्रमाला दिले आहे. राज्यातील प्रत्येक बाजार समितीने राहाता बाजार समितीचे अनुकरण करून गरजूंना अन्न उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख