`वृद्धेश्‍वर`च्या वजनकाट्यातील मापात पाप, शेतकरी रस्त्यावर - Sin on the scales of the old man's weight, the farmer on the road | Politics Marathi News - Sarkarnama

`वृद्धेश्‍वर`च्या वजनकाट्यातील मापात पाप, शेतकरी रस्त्यावर

राजेंद्र सावंत
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी संबंधित विभागाकडून 3 फेब्रुवारी रोजी झालेली आहे. तेव्हा शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

पाथर्डी : श्री वृद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या वजनकाट्यात तफावत असल्याचा आरोप करत आज शेतकऱ्यांनी कारखाना कार्यस्थळावर आंदोलन केले. या वेळी नायब तहसीलदार पंकज नेवसे व कारखाना प्रतिनिधींनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

श्री वृद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्यावर आज पहाटे एका टायर बैलगाडीचे वजन करण्यात आले. मात्र ऊस मालक साहेबराव पवार व कारखाना व्यवस्थापनात वजनावरून मतभेद झाले. त्यानंतर शेतकरी संघटनेचे शरद मरकड, संदीप राजळे, रमेस कचरे, बाळासाहेब गर्जे, अरविंद भगत, एकनाथ लोंढे यांच्यासह शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया बंद पाडली. पहाटे पाच ते दुपारी एक वाजेपर्यंत वजन काटा बंद राहिला. या वेळी नायब तहसीलदार पंकज नेवसे व कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक रवींद्र महाजन आंदोलनस्थळी आले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. तसेच या प्रकाराची चौकशी करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. 

संबंधित विभागाकडून तपासणी

कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी संबंधित विभागाकडून 3 फेब्रुवारी रोजी झालेली आहे. तेव्हा शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. अद्यापही कोणाला काही शंका असेल, तर संबंधित विभागाकडून पुन्हा वजनकाट्याची तपासणी करण्यात येईल, असे नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी सांगितले.

हेही वाचा... राम शिंदेंना मिळाला कलेक्टर जावई

 

द्वेषातून आंदोलन करू नये 

कारखान्याच्या वजनकाट्यामध्ये काहीच अडचण नाही. गैरसमजुतीतून व द्वेषातून आंदोलन करू नये. कारखान्याचे काम पारदर्शक सुरू आहे, अशी प्रतिक्रिया कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक रवींद्र महाजन यांनी व्यक्त केली.

 

हेही वाचा...

"फास्टॅग' नसलेल्यांकडून  दुप्पट "टोल'आकारणी 

पाथर्डी : तालुक्‍यातील बडेवाडी शिवारातील कल्याण- विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गावरील "टोल'नाक्‍यावर, "फास्टॅग' नसलेल्या सुमारे 30 वाहनांच्या चालकांना दुप्पट "टोल'आकारणी करण्यात आली. 

हेही वाचा... तर वर्षावर शिवजयंती साजरी करू

सरकारने आजपासून "टोल'वसुलीसाठी वाहनांना "फास्टॅग' लावणे बंधनकारक केले आहे. आज पहिल्याच दिवशी अनेक वाहनचालकांकडे "फास्टॅग' नसल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित वाहनचालकांना दुप्पट "टोल'आकारणी करण्यात आली. वाहनधारकांनी तातडीने "फास्टॅग' सुविधा घ्यावी, असे आवाहन "टोल'नाका व्यवस्थापक बंडू कराड यांनी केले. 

दरम्यान, टोलवसुलीसाठी वाहनांना फास्टॅग लावणे बंधनकारक केल्यामुळे अनेक वाहनचालकांची धावपळ उडाली आहे. बहुतेक वाहनधारकांचे लायसेन्स, विमा आदी अनेक अडचणी आहेत. त्यामुळे याबाबत वाहनधारकांमधून टॅक्स भरण्यासाठी धावपळ सुरू  झाली आहे.

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख