मनोज कोतकर यांच्या पक्षांतरावर भाजप नेत्यांची चुप्पी - Silence of BJP leaders on Manoj Kotkar's defection | Politics Marathi News - Sarkarnama

मनोज कोतकर यांच्या पक्षांतरावर भाजप नेत्यांची चुप्पी

मुरलीधर कराळे
रविवार, 27 सप्टेंबर 2020

पक्षाचे नगरसेवक मनोज कोतकर ऐनवेळी राष्ट्रवादीत जाऊन स्थायी समितीचे सभापती झाले. भाजपला उमेदवारही देता आला नाही. मोठे महाभारत घडूनही कोणताही नेता उघडपणे बोलत नाही.

नगर : केंद्रात सत्तेत असलेला व देशात सर्वात मोठा ठरलेल्या भाजपची नगर जिल्ह्यात मात्र चांगलीच नाचक्की झाली आहे. जिल्ह्यात पक्षाचे एक खासदार, तीन आमदार, महापाैर, दोन जिल्हाध्यक्ष, आणि माजी मंत्री असूनही भाजपला एक नगरसेवक सांभाळता आला नाही. पक्षाचे नगरसेवक मनोज कोतकर ऐनवेळी राष्ट्रवादीत जाऊन स्थायी समितीचे सभापती झाले. भाजपला उमेदवारही देता आला नाही. मोठे महाभारत घडूनही कोणताही नेता उघडपणे बोलत नाही. नेत्यांची चुप्पीमागचे गमक लोकांना मात्र उलगडले नाही.

नगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाची नुकतीच निवड झाली. महापालिका सध्या भाजपच्या ताब्यात आहे. भाजपचाच महापाैर आहे. सभापती निवडीसाठी भाजपने आपला उमेदवार म्हणून मनोज कोतकर यांचे नाव जाहीर केले. ऐन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही तास आधी अचानक त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केला. त्यामुळे हतबल झालेले भाजपचे नेते ऐनवेळी कोणाला उमेदवार म्हणून उभे करणार, असाच प्रश्न उपस्थित झाला. भाजप उमेदवार देण्यास असमर्थ असल्याचे पाहून शिवसेनेनेही दिलेला उमेदवार योगिराज गाडे यांना अर्ज मागे घेण्यास सांगून महाविकास आघाडीचा धर्म पाळला. अखेर कोतकर बिनविरोध सभापती झाले. या सर्व घडामोडीत राष्ट्रवादीने बाजी मारली. भाजपचे नेते मात्र तोंडावर पडले.

नगरमध्ये भाजपचे दिग्गज नेते आहेत. खासदार डाॅ. सुजय विखे पाटील, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या घडामोडीत कायम सहभाग असणारे विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, महापालिकेत सत्तेवर असलेले महापाैर बाबासाहेब वाकळे या नेते मंडळींनाही नगरसेवकाचे पक्षांतर थांबविता आले नाही. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिलेले प्रा. राम शिंदे, जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवणारे माजी आमदार शिवाजी कर्डिले तसेच दोन जिल्हाध्यक्ष अशी मोठी फाैज असताना सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकून मनोज कोतकर दुसऱ्या पक्षात जाणे शक्य नाही.

मोठी घटना घडूनही पक्षाचे कोणतेच नेते उघडपणे काहीच बोलत नाहीत, याचा अर्थ या घटनेला भाजपच्या काही नेत्यांचा पाठिंबाच होता, किंवा उमेदवार उभा करून उपयोग नाही. शिवसेना अखेर राष्ट्रवादीला साथ देईल, आपला उमेदवार तोंडघशी पडेल, असे समजून भाजपने आत्मविश्वास गमावला, असेही राजकीय धुरिणांचे मत आहे. भाजपला यापूर्वी राष्ट्रवादीने केलेली मदतीची परतफेडही या निमित्ताने केली, असेही म्हणता येईल. नेत्यांची चुप्पी सर्व काही सांगून जाते.

लवकरच याबाबत बोलू : महापाैर

नगर महापालिकेत झालेल्या घटनेबाबत भाजपचे महापाैर बाबासाहेब वाकळे यांनीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. याबाबत जिल्हाध्यक्ष व आम्ही लवकरच बोलू, असे सांगून त्यांनी विषयाला बगल दिली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख