श्रीरामपूर नगरपालिका ! पळकुट्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करणार - Shrirampur Municipality! Fugitive will file a case against the contractor | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

श्रीरामपूर नगरपालिका ! पळकुट्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करणार

गाैरव साळुंके
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा झाली. या वेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, प्रभारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे उपस्थित होते.

श्रीरामपूर : नगरपालिकेने दिलेला शहरस्वच्छतेचा ठेका ठेकेदाराने अर्धवट सोडून दिल्याने, त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. जप्तीच्या रकमेतून सफाई कामगारांचे पगार करण्यात येतील, असा निर्णय नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. स्वच्छतेचा ठेका नवीन ठेकेदाराला देण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. 

नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा झाली. या वेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, प्रभारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे उपस्थित होते.

घनकचरा ठेकेदाराने पालिकेचे काम सोडून अनेक दिवस झाले असून, पालिकेने अद्याप कुठलीही कारवाई न केल्याबाबतचा मुद्दा नगरसेवक संजय फंड, किरण लुणिया, मुजफ्फर शेख यांनी उपस्थित केला. त्यावर नगराध्यक्ष आदिक म्हणाल्या, ""संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. तसेच, जप्तीच्या रकमेतून सफाई कामगारांचे पगार केले जाणार आहेत.''

ठरावाला उपस्थित नगरसेवकांनी मंजुरी दिली. पालिकेने ठेकेदाराकडून बॅंक गॅरंटी घेतली नसल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला. घनकचरा ठेका प्रक्रियेत प्रशासकीय चुका आढळून आल्याने मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यापूर्वी विविध ठेक्‍यांप्रकरणी अनेक गुन्हे दाखल केले असून, अद्याप कुठलीही कारवाई झाली नसल्याने, संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी नगरसेवक अंजूम शेख, भारती कांबळे, राजेश अलग, मुक्तार शहा यांनी केली. सभेत पाणीसाठवण तलावासह कचरा डेपो परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेसह वीजपुरवठा सुरळीत करावा, कचरा डेपो विलगीकरणाचा आढावा घ्यावा, नवीन ठेका देण्यापूर्वी ठेकेदाराच्या कामाची चौकशी करावी, अशा मागण्या उपस्थित नगरसेवकांनी केल्या. 

दरम्यान, नगराध्यक्ष आदिक यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असून, "ठेकेदाराला स्वच्छतेचा ठेका परवडणार नाही, कामगारांना पगारासाठी पैसे पुरणार नाहीत,' असे भाकीत त्यांनी केले होते. ते आज खरे ठरल्याचे वक्तव्य उपनगराध्यक्ष ससाणे यांनी केले. असा वैयक्तिक आरोप केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा आदिक यांनी दिला. ससाणे यांनी त्याचा निषेध केला. 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख