श्रीरामपूरमध्ये दुभत्या गायीला घातली दुधाने आंघोळ - In Shrirampur, a dairy cow is bathed in milk | Politics Marathi News - Sarkarnama

श्रीरामपूरमध्ये दुभत्या गायीला घातली दुधाने आंघोळ

गाैरव साळुंके
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

कोरोनामुळे शेतकरी मोडला असून, शेतीस पुरक दुध व्यवसाय अडचणीत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीचा सामना करीत आहेत. दुध दरवाढीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहेत.

श्रीरामपूर : दुध दरवाढीबाबत सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आज श्रीरामपूर तालुक्यात भाजप नेते, शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलने केली. कारेगाव (ता. श्रीरामपूर) येथे तर आज दुभत्या गायीला दुधाने आंघोळ घालुन आंदोलन केले.

कोरोनामुळे शेतकरी मोडला असून, शेतीस पुरक दुध व्यवसाय अडचणीत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीचा सामना करीत आहेत. दुध दरवाढीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहेत. दुध दरवाढीबाबत सरकारने तात्काळ योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा शेतकरी शांत बसणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांना दिला. 

दुध दरवाढीसाठी आज पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद तालुक्यातील टाकळीभान, मुठेवाडगाव, कारेगाव, गोंडेगाव, निमगाव खैरी, पढेगावसह ४३ गावात उमटले. आंदोलनात माजी सभापती दीपक पटारे, शेतकरी संघटनेचे सुभाष पटारे, सरपंच राजेंद्र पटारे, जालिंदर होले, सतीष पटारे, कैलास पटारे, राजेंद्र उंडे यांच्यासह दुधउत्पादकांनी सहभाग नोंदविला. कारेगाव येथे भाजपा कार्यकर्त्यांनी आज सकाळी गायीला दुधाचा अभिषेक घालुन दुधदरवाढीसाठी संताप व्यक्त केला. आंदोलकांनी पहाटे दुध काढुन संकलन केंद्रात जमा न करता परिसरातील गरजुंना वाटप करण्याचा निर्णय घेतला. दुधदरवाढीसाठी रस्त्यावर येवून घोषणाबाजी करत आक्रोश व्यक्त केला. 

दुधाला सरासरी ३० रुपये दर मिळावा, दुध उत्पादकांना प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यावेत, दूध भुकटी निर्मितीसाठी ५० रुपये अनुदान मिळाले, अशा प्रमुख मागण्यांसह विविध मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. दुधदरवाढीसाठी प्रातांधिकारी अनिल पवार यांना निवेदन देऊन भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल वाणी, सरचिटणीस सतिश सौदागर, विशाल अंभोरे, विजय लांडे यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

दरम्यान, श्रीरामपूर तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. सर्वच ठिकाणी भाजप नेत्यांनी परिसर दणाणून सोडला. सरकारविरोधातील घोषण देवून कार्यकर्त्यांनी सरकारी धोरणांचा निषेध केला. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पुरक ठरणाऱ्या दुध धंद्याकडे लक्ष देवून दूध दरवाढ तातडीने करावी. शेतकऱ्यांना अनुदान वर्ग करावे, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख