श्रीरामपूर : येथील भाजपा बुथ प्रमुखांसह शक्ती केंद्र प्रमुखांनी दिलेले राजीनामे नाट्य आहे. त्यांच्या नियुक्त्या केवळ मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी होत्या. त्यामुळे आता नुतन निवडी होणार असल्याने राजीनामा देण्यास महत्व नाहीत. स्वतःचे पद अबाधित ठेवण्यासाठी इतरांना राजीनामे देण्यास भाग पाडले. त्यांनी स्वतःचे राजीनामे देवुन जिल्हाध्यक्षांवर आरोप करावेत, अशी टीका भाजपाच्या येथील नुतन पदाधिकाऱ्यांनी भाजपा श्रीरामपूर संचलन समितीच्या समर्थकांवर केली आहे.
येथील मातोश्री मंगल कार्यालयात नुतन भाजपा कार्यकर्त्यांचा काल सायंकाळी मेळावा झाला. मेळाव्यात प्रारंभी तालुकाध्यक्ष बबन मुठे यांनी प्रास्तविक केले. तसेच शहराध्यक्ष मारुती बिंगले यांनी मनोगत व्यक्त केले. येथील भाजपाच्या नुतन निवडी राजकीय वादात अडकल्यामुळे भाजपात दोन गट निर्माण झाले. बुथप्रमुखांसह शक्ती केंद्र प्रमुखांना डावलून नियुक्त केल्याचा आरोप करीत २१२ बूथ प्रमुखांसह ४४ शक्ती केंद्राध्यक्षानी राजीनामे देऊन भाजपा श्रीरामपूर संचलन समिती स्थापन केली. त्यावेळी समितीने नुतन पदाधिकार्यांना मेळावा घेण्याचे आव्हान दिल्यामुळे भाजपाच्या नुतन पदाधिकारी समर्थकांनी आज शक्ती प्रदर्शन करीत शशिकांत कडूस्कर यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा घेतला.
या वेळी जिल्हा सरचिटणीस अनिल भनगडे, सुनील वाणी, नगरसेविका भारती कांबळे, शहराध्यक्ष मारुती बिंगले, तालुकाध्यक्ष बबन मुठे यांनी नामोल्लेख टाळुन भाजपाचे पदाधिकारी प्रकाश चित्ते यांच्यावर टीका केली. त्यांनी इतरांना राजीनामे द्यायला लावले. आणि स्वतःचे पद अबाधित ठेवल्याचा सवाल मेळाव्यात उपस्थित करण्यात आला. प्रथम त्यांनी राजीनामा द्यावेत. त्यानंतर जिल्हाध्यक्षावर टीका करावी. आम्ही पक्ष वाढविला असुन ते साधे निवडूनही आले नाहीत. अशी टीका नुतन पदाधिकार्यांनी केली केली. साम-दान-दंड-भेद वापरुन बुथ प्रमुखांचे राजीनामे घेतले. नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी प्रदेशावरुन झाल्या आहेत. जिल्हाध्यक्ष गोंदकर यांनी केवळ त्या जाहीर केल्यात. त्यात त्यांची भुमिका नाहीत. त्यामुळे संघटन मंत्र्याला संघटन मंत्री म्हणावे लागेल. असे जाहीर आव्हान मेळाव्यात दिले. मेळ्याव्यासाठी रामभाऊ तरस, विठ्ठल राऊत, सतीश हारगुडे, शंतनू फोपसे, संदीप शेलार, सुप्रिया धुमाळ, सुनिल चंदन उपस्थित होते.
दरम्यान, भाजपच्या या राजीनामा नाट्यामुळे भाजपअंतर्गत दोन गट पडले असून, पदाधिकारी व कार्यकर्ते असे वाद निर्माण होऊ पाहत आहेत. कार्यकर्त्यांकडून होत असलेले आरोप आगामी काळात पदाधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडणार आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपधील हा वाद आता महाराष्ट्रात चर्चेला जाऊ लागला आहे.
Edited By - Murlidhar Karale

