Shocking! Infected six corona found during the day in nagar | Sarkarnama

धक्कादायक ! नगरमध्ये दिवसभरात आढळले सहा कोरोना बाधित

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 मे 2020

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ६० वर पोहोचली आहे. सायंकाळी बाधित आढळलेल्या पाच व्यक्तीपैकी तीन व्यक्ती काल सुभेदार गल्लीत आढळलेल्या वृद्ध महिलेच्या नात्यातील आहेत.

नगर : शहरातील सारसनगर येथील ५३ वर्षीय व्यक्ती सकाळी कोरोना वाधित आढळून आल्यानंतर आज सायंकाळी पुन्हा आणखी पाच व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे दिवसभरात सहा रुग्णांची भर पडली आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ६० वर पोहोचली आहे. सायंकाळी बाधित आढळलेल्या पाच व्यक्तीपैकी तीन व्यक्ती काल सुभेदार गल्लीत आढळलेल्या वृद्ध महिलेच्या नात्यातील आहेत, तर एक व्यक्ती या महिलेने ज्या खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले, तेथील रिसेप्शनीस्ट आहे. आणखी एक व्यक्ती निघोज येथील असून, त्या व्यक्तीचा काल मृत्यू झाला होता. मात्र, त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. आज त्याचा अहवाल पॉझिटीव आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. दरम्यान, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, सार्वजनिक संपर्क टाळा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे ११ अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी सारसनगर येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सायंकाळी पुन्हा पाच अहवाल प्राप्त झाले. हे पाचही कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. सकाळी बाधित आढळलेली व्यक्ती ड्रायव्हर असून, त्याने पुणे-मुंबई प्रवास केला आहे. या व्यक्तीला दोन दिवसापूर्वी सर्दी, खोकला याचा त्रास होऊ लागल्याने त्याला सुरुवातीला खासगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले.

मुलगा, सूनही बाधित

दरम्यान, मंगळवारी बाधित आढळलेल्या महिलेच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात या महिलेचा मुलगा, सून आणि शेजारी यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्या महिलेने ज्या खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले होते, तेथील रिसेप्शनीस्टही बाधित आढळून आली दरम्यान, पारनेर तालुक्यातील निघोज येथील एका व्यक्तीचा काल मृत्यू झाला होता. त्याचा अहवालही आज पॉझिटीव आला. दरम्यान, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने तात्काळ पावले उचलून या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या असून, या व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेतली जात आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख