नगर : शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड (वय 70) यांचे आज (बुधवारी) पहाटे ह्यदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा विक्रम, 3 मुली असा परिवार आहे. आज सकाळी 10.30 वाजता अमरधाम येथे अनिल राठोड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मागील आठवड्यात त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राठोड हे पाच वेळा आमदार होते. तब्बल 25 वर्षे नगर शहरावर आमदार म्हणून काम करताना त्यांना सर्वसामान्यांचा नेता ही बिरुदावली लागली होती. अनिल भैय्या म्हणून ते सर्वसामान्यांच्या ह्यदयात होते. कोणीही केवळ फोनवर अडचण सांगितली, तरी ते स्वतः हजर राहत. प्रशासकीय यंत्रणेला तेथूनच फोनवरून खडसावत संबंधित प्रश्न मार्गी लावण्याची त्यांची हातोटी होती.
राजपूत समाजाचे राठोड कुटुंबिय मुळचे राजस्थानचे. अनिल राठोड यांचे पूर्वज पुणे जिल्ह्यातील मंचर येथे स्थायिक झाले होते. कालांतराने राठोड यांचे वडील नगरला स्थायक झाले. अनिल राठोड यांचा जन्म 12 मार्च 1950 रोजी झाला. त्यांच्या वडीलांनी नगरमध्ये प्रारंभी राॅकेलचा व्यावसाय सुरू केला. अनिल राठोड यांनी पदवीपर्य़ंत शिक्षण घेत नंतर काही काळ पुणे, मुंबईतील कंपन्यांत नोकरी केली. त्या दरम्यान कायद्याचे शक्षणही सुरू केले होेते. परंतु घरच्या जबाबदारीमुळे ते पुन्हा नगरला आले व नेता सुभाष चाैकात पावभाजी व ज्युस सेंटर सुरू केले. हे काम करीत असताना त्यांच्यातील कार्यकर्ता शांत बसला नाही. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणे सुरू केले. हिंदू एकता आंदोलनाची शाखा नगरला सुरू झाल्यानंतर ते संघटनेचे काम करू लागले. एके दिवसी मुंबईहून आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर थेट नगर शहर प्रमुखपदाची जबाबदारी टाकली. तेव्हापासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले.
80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे ब्रीद घेवून राठोड काम करीत. नगर शहरावर तब्बल 5 वेळा आमदार म्हणून काम करताना त्यांची वेगळी छाप होती. `शिवसेनेचा वाघ` म्हणून त्यांना ओळखले जात होते. त्यांनी मातोश्री ट्रस्ट, नेता सुभाष तरुण मंडळ, मातोश्री वृद्धाश्रम, धर्मवीर जगदीश भोसले पतसंस्था आदी संस्थांची स्थापना केली.
शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांचे ते विश्वासू होते. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही त्यांच्याशी जवळीक होती. मागील आठवड्यात ते आजारी असताना थेट मुख्यमंत्र्यांनी त्यांची विचारपूस केली होती.

