नगर : महापालिकेत महापाैर शिवसेनेचाच करायचा, आगामी काळातही शहरावर शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे, या दिवंगत नेते अनिल राठोड यांच्या विचाराने प्रेरीत होऊन शहरातील शिवसेनेतील दोन्ही गट एकत्र आले. एकत्रित बैठक घेऊन शहरातील प्रश्नांसाठी एकदिलाने काम करण्याचे सांगून दिलजमाई झाली. आजची बैठक शिवसेना संघटनवाढीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली.
नुकतीच राठोड यांचे पूत्र माजी नगरसेवक विक्रम राठोड यांनी नाराज गटाशी चर्चा करून सर्व शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते. त्याचाच एक भाग म्हणून आजच्या बैठकिचे नियोजन करण्याचे ठरले होते. त्यानुसार आज बैठक झाली. यामध्ये दोन्ही गटांचे नेते उपस्थित होते. यापुढे पक्षांतर्गत गटबाजी दिसणार नाही, असा निश्चय नेत्यांनी केला. याला कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या वेळी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, महिला आघाडीप्रमुख आशा निंबाळकर, माजी महापाैर भगवान फुलसाैंदर तसेच नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकिस संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी मार्गदर्शन केले. यापुढे ठाकरे कुटुंबियांचा आदेश मोडणार नाही, अशी शपथ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे म्हणाले, हे मनोमिलन कायमस्वरुपी राहणार आहे. यामध्ये कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला, तर त्याची शिवसेनेतून कायमस्वरुपी हकालपट्टी केली जाईल. आगामी काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांविरोधात वक्तव्य केलेले आढळल्यास त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल. पक्ष एकसंघ राहिल्यास आगामी आमदार शिवसेनेचाच असेल. तसेच महापाैरही शिवसेनेचाच होणार आहे.
विक्रम राठोड संवाद साधताना भाऊक झाले. दिवंगत नेते अनिल राठोड यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. शिवसेना पक्षाची ताकद यापूर्वी दिसून आली आहे. 25 वर्षे आमदारकी शिवसेनेकडे राहिली होती, आगामी काळातही ती पुन्हा मिळविण्यासाठी सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकत्रित राहण्याची गरज नेत्यांनी भाषणातून व्यक्त केली.

