मंत्री गडाखांमुळे नेवासे तालुक्यात शिवसेनेची दमदार 'एन्ट्री' - Shiv Sena's 'entry' in Nevasa taluka due to Minister Gadakh | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्री गडाखांमुळे नेवासे तालुक्यात शिवसेनेची दमदार 'एन्ट्री'

सुनील गर्जे
बुधवार, 20 जानेवारी 2021

विधानसभा निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून (अपक्ष) उमेदवारी करून ऐतिहासिक विजय मिळविणारे नेवासे तालुक्याचे लोकप्रतिनिधी शंकरराव गडाख यांनी निकालानंतर शिवसेनेला पाठिंबा दिला.

नेवासे : विधानसभा सदस्य, 56 ग्रामपंचायतींपाठोपाठ मुळा साखर कारखान्याच्या रूपाने सहकार क्षेत्रातही राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा फडकल्याने खऱ्या अर्थाने नेवासे तालुका भगवामय झाला आहे. नेवासे तालुक्यात हा शिवसेनेला दुग्ध शर्करा योग'च म्हणावा लागेल.

विधानसभा निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून (अपक्ष) उमेदवारी करून ऐतिहासिक विजय मिळविणारे नेवासे तालुक्याचे लोकप्रतिनिधी शंकरराव गडाख यांनी निकालानंतर शिवसेनेला पाठिंबा दिला. राज्यात नेमकी कोणाची सत्ता येईल, याचा कोणताही विचार करता विनाअट - विनाशर्त शिवसेनेला जाहीर पाठिंबा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेऊन शिवसेननेला जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर तब्बल दोन-अडीच महिने सरकार स्थापनेचा तिढा सुटून शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेससह मित्र पक्षांची महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.

गडाख यांनी विनाशर्त दिलेल्या पाठिंब्याच्या बदल्यात शिवसेनेने नेतृत्वाने त्यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद बहाल केले. पुढे मृद व जलसंधारण या महत्वाच्या विभागाचे कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले गडाख हे रितसर शिवसेनेत डेरेदाखल झाले. 

राजकारण, समाजकारणात सरळमार्गी शांत, मात्र रोखठोक स्वभाव असलेले मंत्री गडाखांच्या पक्ष प्रवेशाने शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात दिग्गज राजकीय वलय असलेला तसेच सहकार, शिक्षण क्षेत्रातील मोठे प्रस्थ गळाला लागले आहे. या नव्या राजकीय समिकरनांमुळे सरकारात गडाखांचे तर सहकार, शिक्षण क्षेत्रात शिवसेनेचे वजन वाढल्याचे नमूद केले तर ते वावगे ठरू नये. 

विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच तालुक्यात संपन्न झालेल्या 59 पैकी तब्बल 56 ग्रामपंचायतींमध्ये मंत्री गडाख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने बाजी मारून सत्ता मिळवली आहे. अर्ध्या तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत बहुतांश ग्रामपंचायतींवर भगवा फडकल्याने नेवासे तालुक्यावर मंत्री गडाखांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झाल्याचे शिवसेनेच्या स्थापनेनंतर सहकाराच्या नगर जिल्ह्यात प्रथमच घडले आहे.

दरम्यान, नगर जिल्ह्याच्या राजकीय, सहकार वर्तुळात मोठा दबदबा असलेल्या मुळा सहकारी साखर कारखान्याची निवडणूकही नुकतीच बिनविरोध झाल्याने गडाख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसाठी हा दुग्ध शर्करा योग असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाऊ लागले आहे.

यांचेही योगदान

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना होमपीच म्हणून नगर, तर पालकमंत्री म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याबरोबरच केबिनेट मंत्री म्हणून संपूर्ण राज्यत वेळ द्यावा लागतो. या व्यापातूनही मंत्री गडाख तालुक्याला वेळ देतातच, त्याच बरोबर यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख, जिल्हा परिषदेचे सभापती सुनील गडाख, युवा नेते उदयन गडाख यांची टीम नियोजनबद्ध पद्धतीने कामे करत असल्याने त्यांचेही पक्ष वाढीसह विकास कामांत तालुक्यासाठी मोठे योगदान आहे. 
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख