नेवासे : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत नेवासे तालुक्याच्या सेवा संस्था मतदारसंघातून राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांची, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या माध्यमातून शिवसेनेचा जिल्हा बॅंकेत अधिकृत प्रवेश झाला आहे.
जिल्हा बॅंकेत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा वेगळाच ठसा असल्याचे वारंवार दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून गडाख कुटुंबातील व्यक्तींनी या बॅंकेत तालुक्याचे प्रतिनिधित्व, तसेच यशस्वी नेतृत्व केले आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व विद्यमान मंत्री शंकरराव गडाख यांनी या बॅंकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना, बॅंकेसह शेतकरीहिताचे राज्यपातळीवर दिशादर्शक ठरणारे निर्णय घेतले.
हेही वाचा... विखे पाटील, तनपुरेंनी कर्डिलेंना झुंजवायला लावले
यशवंतराव गडाख यांनी 2004मध्ये अमलात आणलेल्या "पुनर्गठन' योजनेचा आदर्श राज्यातील इतर सहकारी बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांनीही राबविला. शासकीय पातळीवरून या योजनेला विशेष बळ मिळाले.
मंत्री गडाख यांनी महिला बचतगटांना अवघ्या चार टक्के व्याजदराने अर्थसाहाय्य करण्याचा घेतलेला निर्णय सामाजिकदृष्ट्या क्रांतिकारक ठरला. शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदरात, तसेच बिनव्याजी कर्जपुरवठा करण्याच्या जिल्हा बॅंकेच्या बहुतांश धोरणात्मक निर्णयांमागे गडाख कुटुंबच असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा... कर्डिलेंनी अजितदादांऐवजी थोरातांकडे चकरा मारल्या असत्या तर...
या निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मंत्री गडाख यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्या पत्नी रत्नमाला लंघे, नेवासे पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी जावळे, शिवाजी शिंदे यांनी सेवा संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आज अन्य सर्वांनी माघार घेतल्याने मंत्री गडाख यांची या मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली.
मंत्री गडाख यांच्या माध्यमातून प्रथमच शिवसेनेचा दमदार प्रवेश जिल्हा बॅंकेत झाल्याने, जिल्हाभरातील शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, याबाबत महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे.
Edited By - Murlidhar Karale

