राष्ट्रवादीची राजकीय दिशा शिवसेनेच्या वरिष्ठांच्या लक्षात आली : औटी - Shiv Sena seniors noticed NCP's political direction: Auti | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीची राजकीय दिशा शिवसेनेच्या वरिष्ठांच्या लक्षात आली : औटी

सनी सोनावळे 
रविवार, 5 जुलै 2020

राष्ट्रवादी कोणत्या दिशेने चाली आहे, याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते वरिष्ठ जाणून आहेत. त्याबद्दल तेच जास्त चांगले बोलू शकतील, असे पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी सांगितले.

टाकळी ढोकेश्वर : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या  महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आहे. शिवसेनेचे नगरसेवक फोडून ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये घेतले आहेत, ही फोडाफोडी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत झाली आहे. या पक्ष प्रवेशाविषयी पक्षशिस्तप्रमाणे मी प्रतिक्रिया देणे योग्य नाही. याविषयी पक्षाचे नेते अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर हे प्रतिक्रिया देतील.

राष्ट्रवादी कोणत्या दिशेने चाली आहे, याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते वरिष्ठ जाणून आहेत. त्याबद्दल तेच जास्त चांगले बोलू शकतील, असे स्पष्ट करीत पारनेरचे माजी आमदार व सेनेचे जेष्ठ नेते विजय औटी यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीपासून सेनेने आता सावध राहावे, असा सूचक सल्ला दिला आहे.

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी बोलताना याप्रश्नी भावना व्यक्त करीत मौन सोडले. पारनेर नगर पंचायतीमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक व काही कार्यकर्ते यांनी आमदार निलेश यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश खुद्द पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाल्याने या प्रवेशाची राज्यभर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली, वरीष्ठ पातळीवर नेत्यांचे मनोमिलन झाले, मात्र खालील कुरघोडी बंद होत नाहीत.

औटी म्हणाले, मी विधानसभा सदस्य असताना माझ्या पाठपुराव्याने नगरपंचायतची स्थापना झाली. त्यानंतर निवडणूक झाली. या नगरसेवकांनादेखील माझ्याकडे पाहुन लोकांनी मतदान केले. मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून विकासकामे देखील केली. मी कुठेच कमी पडलो नाही. हे नगरसेवक आपल्या स्वार्थासाठी तिकडे गेले असावेत का? हे पुढील निवडणुकीत जनता ठरवील. याविषयी मी काही बोलणार नाही. पक्ष शिस्तीप्रमाणे प्रत्येक पक्षाचे काही संकेत असतात, तसे शिवसेनेत देखील आहेत. शिवसेना शिस्त पाळणारा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाचे प्रवक्ते व वरीष्ठ नेते या पक्ष प्रवेशाविषयी बोलतील. राज्यात तिन्ही पक्षाचे एकत्र सरकार आहे, राष्ट्रवादी आपला पक्ष कशा पद्धतीने वाढवत आहेत, हे आता वरीष्ठांना समजले आहे, मात्र त्याबाबत काय करायचे व काय भूमिका घ्यायची, हे आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारा, असे सांगत पक्षशिस्त आणि नाराजी दोन्ही समोर केल्या.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख