शिवसेनेने आमदार निलेश लंके यांचा वचपा काढला - Shiv Sena ousted MLA Nilesh Lanka | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेने आमदार निलेश लंके यांचा वचपा काढला

मुरलीधर कराळे
गुरुवार, 9 जुलै 2020

`सुंब जळाले, पण पिळ तसाच राहिला.` या उक्तीप्रमाणे राज्यपातळीवर दोन्ही पक्ष एकत्र नांदत असले, तरी दोन्ही नेत्यांची अंतर्गत धुसफूस चालू असणे साहजिकच आहे. मागील खुन्नस अजूनही शाबूत राहिली.

नगर : पारनेर नगर पंचायतीच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत व पुन्हा त्यांची घरवापसी होण्याच्या या प्रकारामुळे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचे डावपेच फेल झाल्याचे दिसून आले. माजी आमदार विजय औटी यांना शह देण्याच्या राजकारणात औटी यांना ऐनवेळी हे आयतेच प्रकरण हाती आल्यामुळे शिवसेनेने लंके यांच्या पुर्वीच्या घडामोडींचा वचपाच काढला, अशीच भावना राजकीय वर्तुळातून चर्चिली जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी निलेश लंके हे शिवसेनेत तालुकाप्रमुख होते. तत्कालिन आमदार विजय औटी यांच्याशी त्यांचे पटले नाही. त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. औटी यांच्यावर आगपाखड करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. नंतर विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून लंके यांना उमेदवारी मिळाली. त्याआधी लंके यांचा धोका ओळखून औटी यांना विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची संधी शिवसेनेने दिली. त्यामुळे औटी यांचे राज्यपातळीवर वजन वाढले. लंके - औटी यांच्या लढतीत औटी यांच्या विजयासाठी शिवसेनेने कसोसीने प्रयत्न केले. मात्र या निवडणुकीत लंके यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. औटी याच्या 25 वर्षाच्या राजकारणातील हा त्यांचा सर्वात मोठा पराभव ठरला. याचे शल्य औटी यांना असणे स्वाभाविक आहे. शिवसेनेलाही एक आमदार गमावल्याचे शल्य होते.

आता महाआघाडी सरकारमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काॅंग्रेस मित्रपक्ष आहेत. राज्यपातळीवर दोन्ही पक्ष एकत्र नांदत असले, तरी दोन्ही नेत्यांची अंतर्गत धुसफूस चालू असणे साहजिकच आहे. मागील खुन्नस अजूनही शाबूत राहिली.

ही कारणे म्हणजे `राजकारणाचाच` भाग

पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीला आता तीन-चार महिने बाकी आहेत. ही पंचायत आपल्याच ताब्यात असावी, असे मनसुबे लंके व औटी यांनी रचले. त्याचाच भाग म्हणून पाच नगरसेवक शिवसेनेतून फुटले (की फोडले). `आपण औटी यांच्या कारभाराला कंटाळलो आहोत, पारनेरचा पाणीप्रश्न सुटत नसल्याने राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचे त्या नगरसेवकांनी सांगितले,` परंतु हे कारण तालुकावासियांना पटले नाही. महाआघाडीच्या सत्तेत दोन्ही पक्ष गुण्यागोविंदाने नांदत असताना आमदार लंके यांनी त्या नगरसेवकांना पक्षात घेणे आघाडी धर्माला संयुक्तिक नव्हते, तथापि, `हे नगरसेवक भाजपमध्ये जात असल्याने आपण त्यांना राष्ट्रवादीत खेचले,` हे आमदार लंके यांचे म्हणणेही लोकांना पटले नाही. कारण लगेचच भाजपच्या तालुकाध्यक्षांनी प्रसिद्धीपत्रक काढून हे नगरसेवक आपल्याकडे आले नव्हते. आपल्या संपर्कातही नव्हते. विनाकारण भाजपची बदनामी नको,` असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे आमदार लंके यांचे हे कारण म्हणजे केवळ बतावणी ठरली. त्यामुळे नगरसेवकांची व आमदार लंके यांनी सादर केलेली कारणे फोल असल्याचे दिसून आले.

शिवसेनेने वचपा काढला

शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या नगरसेवकांमुळे शिवसेनेला काहीच फरक पडणार नाही, असे औटी यांनी ठणकावून सांगितले होते. मात्र हा पक्षप्रवेश यशस्वी झाला, तर त्याचे परिणाम राज्यात उमटतील, हे दोन्ही पक्षांनी जाणून घेतले. त्यामुळे हा प्रकार महाआघाडीच्या दृष्टीने नाचक्की करणारा ठरल्याने त्या नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत पाठविण्यात आले. अर्थात त्यासाठी औटी यांनी जोरदार `फिल्डिंग` लावली. त्यानिमित्ताने लंके यांचे मनसुबे धुळीस मिळविले. लंके यांनी शिवसेनेला दिलेल्या दणक्याचा वचपा शिवसेनेने काढला, असाच त्याचा अर्थ समाजपटलावर उमटला. 

आमदार लंके यांचे यश की अपयश

एकूणच लंके यांनी त्या नगरसेवकांना पुन्हा पाठविले असे म्हणून त्यांनी मोठेपणा दाखविला, असे सांगत लंके यांचे कार्यकर्ते मिरवित असले, तरी मोठेपणा दाखविण्याच्या आधी लंके यांनी विचार करायला हवा होता. पक्षप्रवेशाच्या आधीच त्यांची समजूत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून का नाही काढली, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेना सोडल्यानंतर लंके यांना मोतोश्रीवर जावे लागले. ते स्वतःहून नव्हते गेले, राष्ट्रवादीने त्यांना पाठविले होते, त्यातही कोणताही मोठेपणा राहिला नाही, असेच चित्र निर्माण झाले आहे. या घडामोडीत पारनेरचा पाणीप्रश्न सुटेल, असे वाटत असले, तरी तालुक्याचे दोन्ही नेते औटी व लंके हे त्या-त्या पक्षात वजनदार आहेत. या प्रश्नांवर त्यांनीच यापूर्वी का नाही प्रय़त्न केला, केवळ त्यासाठी कशाला एव्हढी मोठी घडामोड झाली. त्यानिमित्ताने दोन्हीही पक्षाचे हसूच झाले, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे आमदार लंके यांचे यश की अपयश हे प्रत्येकाच्या विचाराचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. इकडे औटी मात्र, आपण या लढाईत जिंकलो, आता नगरपंचायत आपल्यापासून कोणीही हिरावून घेवू शकत नाही, असे मनसुबे रचित नसतील, तर नवलच ! 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख