नगर : नगरमधील शिवसेना बळकट होण्याची चिन्हे असतानाच स्विकृत नगरसेवक निवडीवरुन पुन्हा रणकंद सुरू झाले आहे. या निवडीमध्ये जातीचे राजकारण होत असल्याची तक्रार शिवसेनेचे सावेडी विभागप्रमुख चंद्रकांत (काका) शेळके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच्याकडे लेखी स्वरुपात केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की नगरमध्ये गुरुवारी (ता. 1) स्विकृत नगरसेवक भरणार आहे. आजपर्यंत दिवंगत नेते अनिल राठोड यांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही. म्हणून शिवसेना बळकट राहिली. परंतु काही दिवसांपासून पक्षात जातीचे राजकारण होत असून, राठोड यांनाही पराभूत केले होते. आजही स्विकृत नगरसेवक भरतीच्या वेळी जातीचे राजकारण करून दोन्ही उमेदवार एकाच जातीचे दिले आहेत. तरी आपण याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी शेळके यांनी पत्रात केली आहे.
दरम्यान, शहरात शिवसेनेची घडी बसविण्यासाठी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख प्रयत्न करीत आहेत. स्थायी समितीच्या सभापती निवडीच्या वेळी शिवसेनेने माघार घेत राष्ट्रवादीचा उमेदवार बिनविरोध करून महाआघाडीचा धर्म पाळला. आगामी काळातही शिवसेनेचाच महापाैर होण्याचे घाटत आहे. असे असताना शिवसेनेतील दोन गट मात्र एकत्र येण्याचे नाव घेत नाही. त्याचाच उद्रेक आज शेळके यांनी पात्रविलेल्या पत्राच्या रुपाने दिसून येत आहे.
महापालिकेच्या स्विकृत नगरसेवकपदासाठी पाच जागांची निवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 व भाजपचा 1 असे वाटप आहे. या नगरसेवकांची निवड 1 आॅक्टोबरला होणार आहे. या निवडीत कोणाला संधी मिळणार, यासाठी मोठ्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, शिवसेनेकडे दोन जागांसाठी मदन आढाव व चंद्रकांत शेळके यांची नावे निश्चित केल्याचे मानले जातात. मात्र अंतीम शिक्कामोर्तब झाले नसल्याने त्यातही बदल होण्याचे घाटत आहे. आढाव हे शहराध्यक्ष दिलीप सातपुते गटाचे मानले जातात, तर शेळके हे माजी शहराध्यक्ष संभाजी कदम यांच्या गटाचे मानले जातात.
गुरुवारी निवड होणार असल्याने बंद पाकिटात ही नावे दिली जाणार आहेत. त्यामुळे या पदासाठी इच्छुकांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

