राळेगणसद्धी : औरंगाबादचे संभाजीनगर नामांतरण करण्याच्या भुमिकेने शिवसेना व कॉॅंग्रेस जनतेला मुर्ख बनवित असल्याची टीका भाजपनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
विखे पाटील यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की या प्रकरणामुळे त्याची किमंत औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना व कॉंग्रेसला मोजावी लागेल.
विखे पाटील म्हणाले, की समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील तरूणीच्या आरोपांच्या प्रकरणाबाबत तो राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार त्यासंबंधी निर्णय घेतील, असे सांगत या प्रकरणी भाष्य करण्याचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टाळले.
शेतकऱ्यांबाबत भाजपकडून सकारात्मक तोडगा निघेल
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपस्थित केलेले केलेल्या प्रलंबित शेतक-यांच्या प्रश्नांबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तीशः लक्ष घातले असून, या प्रश्नी सकारात्मक तोडग्यासाठी प्रयत्नशील असून, ते केंद्र सरकारच्या सतत संपर्कात आहेत, असे विखे पाटील यांनी सांगितले.
हजारे यांनी केंद्र सरकारच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिल्यानंतर माजी मंत्री गिरीष महाजन यांनी दोन वेळा, तर विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे यांनी एकदा हजारे यांची राळेगणसिद्धीत भेट घेऊन हजारे यांच्याशी चर्चा केली होती. तर
शनिवारी हजारे यांची विखे पाटील यांनी भेट घेऊन आंदोलनाबाबत सुमारे दीड तास सविस्तर चर्चा केली. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही हजारे यांचे बोलणे करून दिले.
पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, की अण्णांनी उपस्थित केलेले स्वामिनाथन आयोगाप्रमाणे शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळाला पाहिजे. केंद्रिय कृषीमूल्य आयोगाला संविधानात्मक दर्जा मिळाला पाहिजे, यासह अन्य काही यांनी मांडलेले शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. ते फक्त केंद्राशी संबंधित नसून त्याचा राज्याशीही संबंध आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस केंद्राशी संपर्कात राहून सकारात्मक तोडग्यासाठी प्रयत्नशील आहेत.
Edited By - Murlidhar Karale

