साईबाबा पावले ! विखे पाटलांच्या सहकार्यामुळे शिर्डीला "थ्री स्टार' रेटिंग - Shirdi gets "Three Star" rating due to Vikhe Patil's collaboration | Politics Marathi News - Sarkarnama

साईबाबा पावले ! विखे पाटलांच्या सहकार्यामुळे शिर्डीला "थ्री स्टार' रेटिंग

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 मे 2020

केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाने हे रेटिंग जाहीर केले. एकेकाळी कचरा कोंडीने ग्रासलेल्या या नगरपंचायतीने दोन वर्षांपूर्वी स्वच्छ सर्वेक्षणात देशपातळीवर तिसऱ्या क्रमांकाचे पंधरा कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले होते.

शिर्डी : साई संस्थानकडून शहर स्वच्छतेसाठी नगरपंचायतीला दरमहा दिला जाणारा चाळीस लाख रुपयांचा निधी, नामांकित कंपनीला देण्यात आलेला शहर स्वच्छतेचा ठेका आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सहकार्य यामुळे शिर्डी नगरपंचायतीला यंदा कचरामुक्त शहर म्हणून "थ्री स्टार रेटिंग' जाहीर झाले.

केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाने हे रेटिंग जाहीर केले. एकेकाळी कचरा कोंडीने ग्रासलेल्या या नगरपंचायतीने दोन वर्षांपूर्वी स्वच्छ सर्वेक्षणात देशपातळीवर तिसऱ्या क्रमांकाचे पंधरा कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले होते. 

याबाबत मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी सांगितले, की शहर स्वच्छतेचा दैनंदिन आढावा काटेकोरपणे घेतला जातो. दीडशे कर्मचारी त्यासाठी राबतात. आवश्‍यकतेनुसार सतरा घंटागाड्या, चार ट्रॅक्‍टर, दोन डंपर, जेसीबी अशी यंत्रसामग्री वापरली जाते. लॉकडाउन काळातील अपवाद वगळता दररोज सुमारे पंधरा टन ओला व सुका कचरा संकलित होतो. त्याचे विलगीकरण केले जाते. प्लॅस्टिक कचऱ्याची विक्री आणि ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले जाते. सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. शहरातील प्रमुख रस्ते रोड स्वीपर मशिनने धूळमुक्त केले जातात. शहर सदैव स्वच्छ असते. नगराध्यक्ष अर्चना कोते व उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन यांनीही शहराच्या स्वच्छतेबाबतच्या उपाययोजनांची माहिती या वेळी दिली.

शिर्डी हे जागतिक पातळीवरील देवस्थान आहे. महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे लक्ष या शहराकडे लागलेले असते. जगभरातून येणारा भाविक शिर्डीत येत असल्याने हे शहर कायम सुंदर रहावे, यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न केला जातो. येथे पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच सर्व आमदार येवून जातात. तसेच सर्व नामांकित कलाकार येथे भेट देत असतात. त्यामुळे या शहराच्या स्वच्छतेबाबत अधिकारी, पदाधिकारी कायम जागरुक असतात. 

अधिकाऱ्यांचे काैतुक
दोन वर्षांपूर्वी स्वच्छ सर्वेक्षणात नगरपंचायतीने पंधरा कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले. त्यातून स्वच्छतेसाठी आवश्‍यक सुविधा निर्माण करण्यात आल्या. साई संस्थान व नगरपंचायतीच्या समन्वयाने काम होत असल्याने त्यांचे चांगले परिणाम पाहायला मिळत आहेत. मुख्याधिकारी सतीश दिघे व पदाधिकाऱ्यांचे टीमवर्क चांगले आहे, असे काैतुक आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

हेही वाचा...

देवळाली प्रवरा, संगमनेरला एक स्टार 
राहुरी : "स्वच्छ सर्वेक्षण मोहीम 2020' अंतर्गत "कचरामुक्त शहर' स्पर्धेत नाशिक महसूल मंडळाच्या निकालात देवळाली प्रवरा व आणि संगमनेरला एक स्टार मानांकन मिळाले आहे. कचऱ्याची वाहतूक, कचरा डेपो, कचऱ्याची विल्हेवाट, कचऱ्यापासून खतनिर्मिती व विक्री या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रक्रियेची पाहणी करण्यात आली होती. रस्त्यांची स्वच्छता, ओढे-नाले, गटारांची स्वच्छता, बगीचे व बाजारतळांची स्वच्छता, कचराकुंड्या, रस्त्यांच्या दुतर्फा व मोकळ्या भूखंडात वृक्षारोपण आदी सार्वजनिक स्वच्छतेची पाहणी करून गुणांकन करण्यात आले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख