शिरूरच्या महसूल यंत्रणेची श्रीगोंद्याच्या हद्दीत `शायनिंग`! फोडल्या वाळुच्या बोटी - `Shining` of Shirur's revenue system within Shrigonda! Broken sand boats | Politics Marathi News - Sarkarnama

शिरूरच्या महसूल यंत्रणेची श्रीगोंद्याच्या हद्दीत `शायनिंग`! फोडल्या वाळुच्या बोटी

संजय आ. काटे
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

आमची हद्द आहे, आम्ही पाहून घेवू, आपल्या लोकांनी अशी शायनिंग दाखविणारी कारवाई कशासाठी केली, असा प्रश्न तहसीलदार माळी यांनी उपस्थितीत केल्याने दोन्ही महसूल यंत्रणेत एकप्रकारचा तणाव जाणवत आहे.

श्रीगोंदे : शिरुरच्या नायब तहसीदारांनी दोन दिवसांपुर्वी दाणेवाडी (ता. श्रीगोंदे) येथील घोडनदीपात्रात वाळूच्या बोटींचा स्फोट करुन कारवाई केली. मात्र श्रीगोंद्याच्या हद्दीत येत कुठलेही कारण नसताना त्यांनी ही कारवाई केली. दरम्यान, तेथील वाळू उपसाच बंद असून, नदीपात्राच्या कडेला लावलेल्या बंद बोटी फोडल्याचे सांगत येथील तहसीलदार महेंद्र माळी यांनी अशा केवळ शायनिंगच्या कारवाई करु नका, आम्ही थेट कारवाईसाठी सक्षम आहोत, असे शिरुरच्या महसूल यंत्रणेला सुनावले आहे.

वाळू कारवायांवरुन सध्या श्रीगोंदे व शिरुर महसूल यंत्रणेत जुंपण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी शिरुरच्या तहसीलदार लैला शेख यांनी वाळूचोरांचा पाठलाग करीत श्रीगोंद्याच्या हद्दीत येत म्हसे येथे कारवाई केली. त्यांची ती कारवाई चर्चेचा विषय ठरली होती.

आता दाणेवाडी येथे श्रीगोंद्याच्या हद्दीत अशीच कारवाईचा प्रयत्न तेथील निवासी नायब तहसीलदारांच्या पथकाने केली. त्या पथकाने तेथील सहा बोटी फोडून वाळूचोरांचे सुमारे ३५ लाखांचे नुकसान केल्याचा दावा केला. मात्र त्यांची ही करवाई आता वादात सापडली आहे.

श्रीगोंद्याच्या हद्दीत येवून शिरुरच्या पथकाला कारवाई करता येत नाही. तसे संकेत ठरलेले आहेत. मात्र तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी ही कारवाई करण्याचे धाडस का दाखविले, यावरुन सध्या वाद रंगत आहे. त्यावरुन श्रीगोंद्याच्या तहसीलदारांनी थेट नाराजी व्यक्त करीत शिरुरच्या प्रांताधिकाऱ्यांकडे या कारवाईची तक्रार केली.

माळी यांच्या म्हणण्यानुसार, दाणेवाडी येथे कुठलाही वाळू उपसा अथवा चोरी सुरु नव्हती. ही कारवाई होत असताना तेथील कामगार तलाठ्यांनी संबधीतांना अशी हद्द ओलांडून का कारवाई करता, अशी विचारणा केली होती. शिवाय ज्या बोटी फोडल्याचा शिरुरचे पथक दावा करतात, त्या बंद अवस्थेत उभ्या होत्या आणि त्यांच्या संख्या सहा नव्हे, तर दोनच होती. मग बंद असणाऱ्या बोटी फोडून काय सिध्द करण्याचा प्रयत्न होतोय, अशी विचारणा केली आहे. आमची हद्द आहे, आम्ही पाहून घेवू, आपल्या लोकांनी अशी शायनिंग दाखविणारी कारवाई कशासाठी केली, असा प्रश्न तहसीलदार माळी यांनी उपस्थितीत केल्याने दोन्ही महसूल यंत्रणेत एकप्रकारचा तणाव जाणवत आहे.

दरम्यान, शिरुर-श्रीगोंद्याच्या हद्दीतील वाळुउपसा हा विषय कायम महाराष्ट्रभर गाजत असतो. यापूर्वीही अनेक कारवाया येथे झाल्या आहेत.

ते श्रीगोंद्याच्या हद्दीत घुसले ः माळी

शिरुरच्या पथकाचा श्रीगोंद्याच्या हद्दीत कारवाई करण्याचा संबध नाही. त्यासाठी आम्ही सक्षम आहोत. शिवाय बंद बोटी फोडून शायनिंग दाखविणारी ही कारवाई झाली. आता तेथील प्रांताधिकाऱ्यांशी बोललो आहे. यापुढे असा प्रयत्न झाल्यास पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करु, असे मत तहसीलदार महेंद्र माळी यांनी व्यक्त केले.

आपली परवानगी घेतली नाही ः शेख

अशी काही कारवाई झाल्याचे मला समजले. मात्र संबधीत अधिकारी, पथकातील कर्मचाऱ्यांनी  कारवाईची कुठलीही माहिती अगोदर दिली नाही, अथवा आपली परवानगीही घेतलेली नाही, अशी प्रतिक्रिया शिरुरच्या तहसीलदार लैला शेख यांनी दिली.

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख