भाजप प्रभारीमध्ये शिंदे यांनाच संधी, नगरचे नवे प्रभारी पांगारकर, वाघ व सावजी - Shinde is the only BJP in-charge, Pangarkar, Wagh and Savji are the new in-charges of the town | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप प्रभारीमध्ये शिंदे यांनाच संधी, नगरचे नवे प्रभारी पांगारकर, वाघ व सावजी

मुरलीधर कराळे
गुरुवार, 30 जुलै 2020

नाशिक ग्रामीणचे जिल्हा प्रभारी म्हणून शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे भाजपच्या इतर `पक्षनिष्ठ` म्हणविणाऱ्या नेत्यांना पुन्हा अलगत बाजुला ठेवल्याची भावना कार्यकर्त्यांमधून झाली आहे.

नगर : भारतीय जनता पक्षाने राज्यातील जिल्हा प्रभारीची यादी जाहीर केली असून, नगर जिल्ह्यातील केवळ माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनाच संधी दिली आहे. त्यांची नाशिक ग्रामीणचे जिल्हा प्रभारी म्हणून शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे भाजपच्या इतर `पक्षनिष्ठ` म्हणविणाऱ्या नेत्यांना पुन्हा अलगत बाजुला ठेवल्याची भावना कार्यकर्त्यांमधून झाली आहे.

भाजपने आज राज्यातील जिल्हा प्रभारीची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये नाशिक ग्रामीणचे प्रा. राम शिंदे जिल्हा प्रभारी आहेत. तसेच नगर शहरासाठी जिल्हा प्रभारी म्हणून मनोज पांगारकर यांची नियुक्ती झाली आहे. नगर उत्तरसाठी स्मिता वाघ यांची, तर नगर दक्षिणसाठी लक्ष्मण सावजी यांची निवड करण्यात आली आहे.

शहरातील विस्कटलेली घडी बसविण्याचे आव्हान

नगर शहरातील भाजपमध्ये दोन गट आहे. शहराध्यक्ष दिलीप गांधी यांचा एक गट, तर काही जुने कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर यांचा गटाशीही चर्चा करून दोन्ही गटाचे वाद मिटविण्याचे आव्हानही नव्या जिल्हा प्रभारीला करावे लागणार आहे. नगर शहरात भाजपचा महापाैर बाबासाहेब वाकळे आहेत. नवीन जिल्हा प्रभारी म्हणून मनोज पांगारकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असल्याने त्यांच्यापुढे दोन गट एकत्र आणण्याचे मोठे आव्हान आहे. 

नगर उत्तरेत विखे पाटील राज

नगर उत्तर जिल्हा प्रभारी म्हणून स्मिता वाघ यांची नियुक्ती झाली आहे. उत्तरेतील सर्वच तालुक्यांवर आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांचे राज आहे. त्यामुळे स्मिता वाघ यांना उत्तरेत विशेष काम राहणार नाही. आगामी काळात प्रभारी म्हणून काम करताना विखे पाटील यांच्या निर्णयावरच त्यांचे निर्णय असतील, अशीच शक्यता आहे.

दक्षिणेतील वाद मिटविण्याचे आव्हान

नगर दक्षिणेत काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेस बळकट आहेत. तसेच पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे व त्यांच्या विरोधातील जुन्या कार्यकर्त्यांचा गट यांच्यातील वाद मिटविण्याचे काम जिल्हा प्रभारी म्हणून लक्ष्मण सावजी यांना करावे लागणार आहे. शिवाय कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना तोंड देण्यासाठी माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांचे हात बळकट करण्याचे काम सावजी यांना करावे लागणार आहे. माजीमंत्री व जुने दिग्गज राजकारणी शिवाजी कर्डिले हे आगामी काळात मुसंडी मारू शकतात. त्यांचा सल्लाही सावजी यांना दक्षिणेत काम करताना कामे येणार आहे. तसेच श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते हे दिग्गज राजकारणी दक्षिणेत आहेत. त्यामुळे सावजी यांना काम करताना त्यांचीही मदत होणार आहे.

 

नगर जिल्ह्यातील प्रभारी 

नगर शहर - मनोज पांगारकर

नगर उत्तर - स्मिता वाघ

नगर दक्षिण - लक्ष्मण सावजी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख