Shinde attended the agitation with his family | Sarkarnama

नाराजी दूर झाली हो ! प्रा. शिंदे आंदोलनात कुटुंबियांसह हजर

वसंत सानप
शुक्रवार, 22 मे 2020

आज झालेल्या आंदोलनासंदर्भात कार्यकर्त्यांनी चार दिवसांपूर्वी जामखेड तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले होते. त्यावेळी माजी मंत्री राम शिंदे कुठे दिसले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष अंदोलनात ते सहभागी होतील का? हा प्रश्न अनुउत्तरीत होता.

जामखेड : विधानपरिषदेच्या निवडणुकीत संधी न मिळालेल्या माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज भाजापने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बचाव' आंदोलनात कुटुंबियांसह सहभाग नोंदविल्याने त्यांची भाजपवर असलेली नाराजी दूर झाल्याचे बोलले जाते. त्यांच्या कुटुंबियांसमवेत सहभागामुळे सर्वांचीच बोलती बंद केली.

या अंदोलनात शिंदे यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी पंचायत समितीच्या माजी सभापती आशा शिंदे, चिरंजीव अजिंक्त शिंदे यांचाही सहभाग होता. हे अंदोलन चौंडीतील माजीमंत्री शिंदे यांच्या निवासस्थासमोर झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सरकार निष्क्रीय ठरले म्हणून महाराष्ट्र बचाओ, शेतकरी, बारा बलुतेदार, असंघटित कामगारांना पन्नास हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे आणि महाराष्ट्र वाचवा अशा आशयाचे फलक दाखवून, कपाळाला निषेध नोंदविणाऱ्या पट्ट्या लावून या सरकारच्या कार्यपध्दतीचा निषेध शिंदे कुटुबियांनी भाजप कार्यकर्त्यांसह नोंदविला.

आज झालेल्या आंदोलनासंदर्भात कार्यकर्त्यांनी चार दिवसांपूर्वी जामखेड तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले होते. त्यावेळी माजी मंत्री राम शिंदे कुठे दिसले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष अंदोलनात ते सहभागी होतील का? हा प्रश्न अनुउत्तरीत होता. विधानपरषदेच्या निवडणुकीनंतर 'भाजप'चे हे राज्यव्यापी पहिलेच आंदोलन होते. त्या निवडणुकीत माजीमंत्री प्रा. शिंदे यांची वर्णी लागणार, असे अखेरच्या क्षणापर्यंत चित्र होते, मात्र राजकारणाच्या सारीपाटावर शह-कटशहाचे राजकारण झाले आणि हाता-तोंडाशी आलेली 'आमदारकी'  दूर गेली. माजीमंत्री शिंदेंना डावल्याने होणाऱ्या या पहिल्या आंदोलानाच्या निमित्ताने माजीमंत्री शिंदे नेमकी कोणती भूमिका घेतात? याकडे सर्वांचेच विशेष लक्ष होते. 

मात्र पक्षाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले म्हणून राज्यभर पुकारलेल्या महाराष्ट्रात बचाव आंदोलनात माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कुटुंबियांसह सहभाग नोंदवून झाले गेले विसरून जावे, पुढे-पुढे चालावे, हा मंत्र जपला. आणि चोंडी येथील घरासमोर आंदोलन करुन सर्वांची बोलती 'बंद' केली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख