काळे कारखान्याचे केंद्राकडे थकलेल्या 26 कोटींसाठी शरद पवार पुढाकार घेणार - Sharad Pawar will take the initiative for 26 crores to the center of the black factory | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

काळे कारखान्याचे केंद्राकडे थकलेल्या 26 कोटींसाठी शरद पवार पुढाकार घेणार

मनोज जोशी
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेत ऊसतोडणी कामगारांना 14 टक्के दरवाढ देण्याचा करार केला. ही वाढ लागू करून आपण कराराचे स्वागत केले.

कोपरगाव : ``केंद्र सरकारकडे काळे कारखान्याचे 26 कोटी रुपये साखरनिर्यात अनुदान थकले आहे. ते लवकर मिळावे, यासाठी शरद पवार पुढाकार घेतील. यंदा अतिरिक्त साखरउत्पादन होणार असल्याने केंद्र सरकारने लगेच निर्यातीचा निर्णय घ्यावा,'' अशी अपेक्षा आमदार आशुतोष काळे यांनी केली. 

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ माजी आमदार अशोक काळे, आमदार आशुतोष काळे व जिल्हा बॅंकेच्या संचालिका चैताली काळे व कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार काळे बोलत होते. कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप, सरव्यवस्थापक सुनील कोल्हे, आसवनी प्रकल्पाचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर आभाळे, सचिव बाबा सय्यद, पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे आदी उपस्थित होते. 

काळे म्हणाले, "ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेत ऊसतोडणी कामगारांना 14 टक्के दरवाढ देण्याचा करार केला. ही वाढ लागू करून आपण कराराचे स्वागत केले. आता साखर कामगारांच्या वेतनवाढीच्या कराराची मुदत संपून दीड वर्षे लोटले. त्रिपक्षीय समितीने याबाबत लवकर निर्णय घ्यावा. आम्ही तो लागू करू. मात्र, पुर्वलक्षी प्रभावाने वेतनवाढीचा निर्णय घेऊ नये.``

नगर जिल्ह्यात उसाचा भावाबाबत कुणी बोलताना दिसत नाही. आम्ही मात्र एफआरपीपेक्षा अधिक भाव देण्याची परंपरा कायम ठेवू. यंदा उसाला पहिला हप्ता प्रतिटन अडीच हजार रुपयांप्रमाणे देऊ. मागील वर्षी गळीत झालेल्या उसाला प्रतिटन शंभर रुपये, तर कामगारांना 18 टक्के बोनस देऊ. त्यांच्या बॅंक खात्यात एकूण साडेसात कोटी रुपये जमा करून सर्वांची दिवाळी गोड करू, अशी घोषणा आमदार काळे यांनी केली.

काळे परिवाराने परंपरा जपली

""ऊसउत्पादक व कामगार हे सर्वाधिक महत्त्वाचे घटक असल्याने, त्यांच्या हिताचे धोरण घेण्याची परंपरा काळे परिवाराने कायम जपली. मागील वर्षी एफआरपीच्या तुलनेत प्रतिटन 208 रुपये जादा भाव दिला. यंदा जिल्हा बॅंकेकडून प्रतिटन 2040 रुपये उचल मिळेल; मात्र त्यात भर घालून यंदा उसाला प्रतिटन अडीच हजार रुपये पहिला हप्ता दिला जाईल. कारखाना कार्यक्षेत्रात सव्वा पाच लाख मेट्रिक टन ऊस आहे. निफाड, नाशिक व पुणतांबे भागातून सव्वा लाख मेट्रीक टन ऊस आणून साडे सहा लाख मेट्रीक टन उसाचे गाळप केले जाईल,'' असे आमदार काळे यांनी सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख