Scientists at Mahatma Phule Agricultural University are happy about this | Sarkarnama

महात्मा फुलेे कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ या कारणाने खुष

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 जून 2020

विद्यापीठातील बियाण्यांवर शेतकऱ्यांनी दाखविलेला हा विश्वास म्हणजे शास्त्रज्ञांना शाबासकीच आहे. त्यामुळे विद्यापीठातील शास्त्रज्ञ सध्या खुष आहेत.

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ऑनलाइन बियाणे विक्रीचा पहिला प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरला. बियाण्यांची विक्री आज (सोमवारी) सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत पूर्ण झाल्याची माहिती विद्यापीठाचे बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके यांनी दिली. विद्यापीठातील बियाण्यांवर शेतकऱ्यांनी दाखविलेला हा विश्वास म्हणजे शास्त्रज्ञांना शाबासकीच आहे. त्यामुळे विद्यापीठातील शास्त्रज्ञ सध्या खुष आहेत.

केवळ तीन तासांच्या या विक्री कालावधीमध्ये विद्यापीठाने 63 लाखांचा महसूल मिळविला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रथमच विद्यापीठाने विकसित केलेल्या खरीप कांद्याचे वाण "फुले समर्थ' व "बसवंत-780' यांचे 4220 किलो सत्यप्रत बियाणे विक्रीसाठी उपलब्ध केले होते. गेल्या वर्षी विद्यापीठाच्या विविध प्रक्षेत्रांवर सुमारे 12 हेक्‍टरवर बीजोत्पादन घेतले होते. अनेक शेतकऱ्यांना प्रथमच असल्यामुळे ऑनलाइनबाबत अडचणी आल्या. वेबसाइटच्या सर्व्हरवरही प्रचंड ताण आल्याने अनेकांना बियाणे मिळू शकली नाहीत. प्रत्येक शेतकऱ्यास केवळ दोन किलो बियाणे मिळत असल्याने मोठ्या शेतकऱ्यांची अडचण झाली. विद्यापीठाच्या या बियाण्यांची वाढीव मागणी पाहता शेतकऱ्यांना बियाणे कमी पडू नयेत, म्हणून कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा व संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी सुमारे 75 हेक्‍टर क्षेत्रावर बीजोत्पादन घेण्याचा मानस डॉ. सोळंके यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा...

सकाळी नऊ ते पाच या वेळेतच व्यवहार सुरू राहणार : विखे 

राहाता : केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरातील दैनंदिन व्यवहार सकाळी नऊ ते पाच या वेळेतच सुरू राहतील. आठवड्यातून दोन दिवस पाळण्यात येणारा बंद यापुढे असणार नाही, असा निर्णय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

या बैठकीस नगराध्यक्ष ममता पिपाडा, डॉ. राजेंद्र पिपाडा, राजेंद्र वाबळे, ऍड. रघुनाथ बोठे, माजी नगराध्यक्ष सोपान (काका) सदाफळ, अजित धाडिवाल, तसेच प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्यासह व्यापारी व पदाधिकारी उपस्थित होते. 
आमदार विखे पाटील म्हणाले, की आरोग्य, महसूल व पोलिस अधिकारी, तसेच कर्मचारी कोरोनाच्या काळात चांगले काम करीत आहेत. सरकारी रुग्णालयातील डॉक्‍टर, तसेच अंगणवाडीसेविका व आशासेविका जिवावर उदार होऊन काम करीत आहेत. यापुढे दैनंदिन व्यवहारात सोशल डिन्स्टन्सिंग व मास्क याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. प्रांताधिकारी शिंदे म्हणाले, की खाद्यपदार्थांची दुकाने व हॉटेल व्यावसायिकांना केवळ पार्सल देण्यापुरती मुभा आहे. केशकर्तनालय व पान दुकाने उघडली जाणार नाहीत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख