नगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी बहुतांश शाळा, महाविद्यालयांनी ऑनलाइन वर्ग घेण्याला पसंती दिली. मात्र, हे ऑनलाइन क्लास घेताना त्याला 45 मिनिटांच्या कालावधीनंतर ब्रेक देणे गरजेचे आहे, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केल्या आहे.
तनपुरे म्हणाले, की ऑनलाइन क्लास घेणाऱ्या संस्था, शाळा, महाविद्यालयांकडून सर्रास दोन-दोन तास क्लास घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑनलाइन क्लास घेताना ब्रेक दिलाच पाहिजे. तशा सूचनाही संबंधितांना देण्यात येणार आहेत.
दरम्यान, अंतिम परीक्षेबाबत सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय घेतला होता. अनिश्चित काळासाठी परीक्षा लांबविल्या, तर विद्यार्थ्यांची हातची नोकरी जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी कायदेशीर मार्ग काढून विद्यार्थ्यांना लवकरच दिलासा दिला जाईल, असे आश्वासन तनपुरे यांनी दिले.
तर गुन्हे दाखल करा
तनपुरे म्हणाले, ""जिल्ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. त्यात मुंबई-पुणे कनेक्शन मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे परजिल्ह्यांतून येणाऱ्या व्यक्तींची तत्काळ माहिती कंट्रोल रूमला दिली पाहिजे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची काटेकोर अंमलबजावणी करा, परजिल्ह्यांतून येणारी कोणतीही व्यक्ती सुटता कामा नये, जिल्ह्यात कोणी चोरून-लपून येत असेल, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा,'' अशा सूचना नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिल्या.

