वीज जोडली म्हणता? अहो तोडलीच का? कर्डिले यांचा मंत्री तनपुरेंना टोला - Says the power is connected? Why did you break it? Cordile's minister called Tanpur | Politics Marathi News - Sarkarnama

वीज जोडली म्हणता? अहो तोडलीच का? कर्डिले यांचा मंत्री तनपुरेंना टोला

मुरलीधर कराळे
शनिवार, 27 मार्च 2021

वीजबिल न भरल्याने नगर व तालुक्‍यातील 29 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या तिसगाव योजनेची वीज गेल्या 25 दिवसांपासून खंडित करण्यात आली होती.

नगर : "गेल्या 25 दिवसांपासून 29 गावांना "पाणी पाणी' करायला लावले. मिरी-तिसगाव पाणीयोजनेची वीज तोडून बिलवसुली केली. लोकांनी पैसे भरले म्हणून आज वीज जोडली. ते मंत्री असताना त्यांच्याच मतदारसंघाची ही दैना, तर राज्याच्या इतर गावांची काय अवस्था असेल? पाणीयोजनेची वीज जोडून श्रेय घेतात, तर ती तोडलीच कशाला,'' असा सवाल करून भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर विविध आरोप केले. 

 

मिरी-तिसगाव पाणीयोजनेची वीज काल जोडण्यात आली. त्याबाबत "सरकारनामा'शी बोलताना कर्डिले यांनी मंत्री तनपुरे यांच्यावर आरोप केले.

ते म्हणाले, ""वीजबिल न भरल्याने नगर व तालुक्‍यातील 29 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या तिसगाव योजनेची वीज गेल्या 25 दिवसांपासून खंडित करण्यात आली होती. सुमारे 29 गावांचे पाण्यासाठी हाल झाले. नगर व पाथर्डी तालुक्‍यांतील गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. थकीत बिलांच्या वसुलीसाठी ही वीज तोडली. ऐन उन्हाळ्यात लोकांची होरपळ केली. वीज जोडल्याचे श्रेय आता त्यांनी घेऊ नये. लोकांनी वीजबिले भरली. त्यामुळेच वीज जोडली. आधीच पाणीयोजनांची वीज खंडित केली नसती, तर ही वेळ आली नसती.'' 

आंदोलन टळले 

भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस अक्षय कर्डिले यांनी मिरी-तिसगाव योजनेची वीज जोडण्याच्या मागणीसाठी पांढरीपुलाजवळ आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आज या योजनेची वीज जोडल्यामुळे हे आंदोलन टळले. 

 

हेही वाचा... 

सोशल मीडिया काळजीपूर्वक हाताळा

नगर : तरुण वर्ग सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहे. या माध्यमांचा योग्य वापर न झाल्यास नैराश्‍य येवून मूळ ध्येयापासून भरकटण्याची शक्‍यता असते. त्यामुळे या त्याचा वापर कमी व काळजीपूर्वक केला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. रेवती देशपांडे यांनी केले. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघटनेच्या संयुक्त विद्यमाने कौडगाव (ता. नगर) येथील कौडेश्‍वर महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यात न्या. देशपांडे बोलत होत्या. 

ऍड. अनुराधा आठरे-येवले यांनी हुंडा प्रतिबंधक कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याबाबत मार्गदर्शन केले. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, मनोधैर्य योजना याबाबतही माहिती दिली. मुख्याध्यापक पोपट पवार व सुनंदा ठोकळ, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून उपस्थित होते. 

 

Edited By - Murlidhar karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख