Saving lives is important, not an immediate tax hike | Sarkarnama

जीव वाचविणे महत्त्वाचे, राज्यात तूर्त करवाढीला `ब्रेक`

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 जून 2020

सध्या जनतेला कोरोनाच्या कचाट्यातून बाहेर काढून जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याबाबत निर्णयसुद्धा घ्यावा लागणार आहे.

नगर : "लॉकडाउनमुळे देशासह राज्याचे अर्थचक्र कोलमडून गेले. औद्योगिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला. लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्याने हळूहळू व्यापार, उद्योग सुरू होऊ लागले आहेत. मुद्रांक विक्रीसुद्धा सुरू झाली. त्यामुळे काही प्रमाणात महसुली उत्पन्न सुरू झाले. राज्याचे उत्पन्न घटलेले असले, तरी तूर्तास कर वाढविण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. सध्या जनतेला कोरोनाच्या कचाट्यातून बाहेर काढून जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याबाबत निर्णयसुद्धा घ्यावा लागणार आहे. त्यादृष्टीने मंत्रिमंडळामध्ये चर्चा सुरू आहे,'' असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोरोनासंदर्भात आढावा बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले, ""राज्यात आंतरराष्ट्रीय विमानतळे असल्याने बड्या घरच्या नागरिकांचा शिरकाव अन्‌ जिल्ह्यात परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा वेग भलताच वाढला. परंतु, शासन-प्रशासन कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अलर्ट आहे. कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे जनतेने भिवंडी, मालेगाव येथील नागरिकांप्रमाणे स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. बाहेरच्या जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांनी सक्तीने स्वतःचे विलगीकरण करून घेतले पाहिजे. मार्च-एप्रिल महिन्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आपण बऱ्यापैकी यशस्वी ठरलो. कोरोनाच्या प्रसाराला लगाम लावण्यासाठी जशी प्रशासन काळजी घेत आहे, त्याचप्रमाणे जनतेनेही काळजी घेतली पाहिजे. दोन महिन्यांपासून मुंबईत आम्ही ठाण मांडून आहोत. यात मजुरांची घरवापसी, गरजूंना अन्नधान्याचे वितरण, आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठीच्या उपाययोजना यावर सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. जीएसटीच्या परताव्यासाठी केंद्राकडे अनेकदा मागणी केली. अद्याप तरी ती मिळालेली नाही. विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षेसंदर्भात शिक्षणमंत्रीच पुढील निर्णय घेतील.'' 
 
सह्याद्रीच्या रांगांमुळे बचावला जिल्हा 

थोरात म्हणाले, "निसर्ग वादळाचा महाड, अलिबाग, श्रीवर्धन आदी समुद्रकिनाऱ्यावरील शहरांना मोठा फटका बसला. महावितरणचेही मोठे नुकसान झाले. आपत्ती व्यवस्थापन दलाची कामगिरी मोलाची ठरली. बहुतांश लोकांना सुरक्षितस्थळी हलविले. रस्त्यावर उन्मळून पडलेली झाडे हटवून मार्ग तातडीने मोकळे केले. जिल्ह्यात मात्र सह्याद्रीच्या रांगांमुळे निसर्ग वादळापासून मोठ्या प्रमाणावर होणारी हानी टळली. आपला नगर जिल्हाही बचावला. पारनेर, संगमनेर, अकोले तालुक्‍यात वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत.'' 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख