शनि शिंगणापूरला जाताय ! आधी सामना `लटकुं`च्या साडेसातीचा - Saturn goes to Shinganapur! Before the match, it was half past seven | Politics Marathi News - Sarkarnama

शनि शिंगणापूरला जाताय ! आधी सामना `लटकुं`च्या साडेसातीचा

विनायक दरंदले
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

सोनई, यशवंतनगर, वंजारवाडी हद्दीत "लटकूं'चा खास "थांबा'च आहे. तेथूनच ते भाविकांच्या वाहनाचा पाठलाग करतात. चालकाला खोटे आमिष दाखवून ठरावीक दुकानापुढे वाहन नेण्यासाठी सक्ती करतात.

सोनई ः सध्या विश्वस्त मंडळात असलेल्या काहींचे वाहनतळ असून, पूजासाहित्य दुकानदारांनी व्यवसायवाढीसाठी "लटकू' नेमले आहेत. दोन वर्षांपूर्वी यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या प्रयत्नांनंतर "लटकू' हद्दपार झाले होते; मात्र ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे शनिच्या दर्शनाला येताना आधी लटकुंची साडेसातीचा सामना करावा लागणार आहे.

लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर शनिशिंगणापुरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आणि या गर्दीचा गैरफायदा घेत रस्त्यावर व गावात भाविकांच्या अडवणुकीतही वाढ झाली आहे. आठवडाभरात एकही कारवाई न झाल्याने पोलिस व सुरक्षा कर्मचारी "शोभेची वस्तू' ठरत आहेत. 

कोरोना लॉकडाउननंतर दिवाळीच्या पाडव्याला भाविकांना दर्शनासाठी शनिमंदिर उघडले. सुरवातीला गर्दीचा ओघ कमी होता. मागील पंधरा दिवसांपासून गर्दी वाढल्यामुळे गावात मोठी व्यावसायिक स्पर्धा सुरू झाली आहे. सध्या सोनई व घोडेगाव रस्त्यांवर शंभराहून अधिक मोटरसायकलस्वार भाविकांच्या चालत्या वाहनांना लटकून, त्यांना ठरावीक ठिकाणाहून पूजासाहित्य खरेदी करण्याची सक्ती करतात. गावात असे दोनशेहून अधिक "लटकू' कार्यरत आहेत. 

सोनई, यशवंतनगर, वंजारवाडी हद्दीत "लटकूं'चा खास "थांबा'च आहे. तेथूनच ते भाविकांच्या वाहनाचा पाठलाग करतात. चालकाला खोटे आमिष दाखवून ठरावीक दुकानापुढे वाहन नेण्यासाठी सक्ती करतात. 

घोडेगाव रस्त्यावर असलेल्या बंद करनाक्‍यावर "लटकूं'नी ताबा घेऊनही ग्रामपंचायत व पोलिस यंत्रणा हाताची घडी घालून आहेत. कोरोना संकटामुळे करनाका बंद ठेवला असल्याचे ग्रामपंचायतीने सांगितले, तर गावात व रस्त्यावर गस्त आणि करनाक्‍यावर बंदोबस्त ठेवल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सांगत असले, तरी भाविकांना "लटकूं'चा मोठा उपद्रव सहन करावा लागत आहे. सोनई पोलिसांचा धाक न राहिल्याने रस्त्यावर "लटकूं'चे प्रमाण वाढले आहे. गावात अरेरावी, दमदाटी व फसवणुकीचे प्रमाण वाढल्याने, आता वरिष्ठांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख