हे सरपंच की हिरो ! आंबी दुमालामध्ये हेलिकॉप्टरने आगमन  - Sarpanch's Hero! Helicopter arrival in Ambi Dumala | Politics Marathi News - Sarkarnama

हे सरपंच की हिरो ! आंबी दुमालामध्ये हेलिकॉप्टरने आगमन 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

ग्रामविकासाचा ध्यास मनात ठेवून गावात विकासगट करणार आहे. स्वच्छतेला प्राधान्य देऊन गाव निरोगी ठेवण्यासाठी आग्रही राहणार आहे. गावकऱ्यांचा विश्वास सार्थ करू, असे सरपंच जालिंदर गागरे यांनी सांगितले.

बोटा : "आमचा सरपंच.. हीरोला ठरतोय भारी...' संगमनेर तालुक्‍यातील आंबी दुमाला गावातील रोकडेश्वर मंदिरासमोर सजलेल्या सभामंडपात गाण्याचे बोल ऐकू येत होते. त्याला कारणही तसेच होते. पठार भागात पहिल्यांदाच सरपंचपदाची व्यक्ती खास हेलिकॉप्टरने प्रवेश करते, तेव्हा ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार राहत नाही. 

हेही वाचा... विखे पाटील, थोरातांनी झुंजायला लावले

ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन सरपंचपदाच्या निवडी नुकत्याच झाल्या. गावच्या सरपंचपदावर उद्योजक जालिंदर गागरे यांची निवड झाली. आपला शपथविधी सोहळा कायमचा स्मरणात राहावा, म्हणून अशा अनोख्या पद्धतीने गागरे कुटुंबाने नियोजन केले. खंडोबाच्या मंदिराजवळील पटांगणात दुपारी बाराच्या सुमारास हेलिकॉप्टरसह गागरे यांचे कुटुंबासह आगमन झाले. ढोल-ताशा व लेझीम खेळासह त्यांची मिरवणूक काढण्यात आली. गावातील महिलांना मानाचे फेटे बांधण्यात आले. या सोहळ्यास आमदार डॉ. किरण लहामटे, अजय फटांगरे, उद्योजक बबन गागरे, शरद सोनवणे, संतोष शेळके, जनार्दन आहेर यांच्यासह बोटा, म्हसवंडी, बेलापूर, भोजदरी, कुरकुटवाडी, अकलापूर गावांतील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. 

हेही वाचा... कर्डिलेंची गुलालाची पोती तशीच राहिली

दरम्यान, ग्रामविकासाचा ध्यास मनात ठेवून गावात विकासगट करणार आहे. स्वच्छतेला प्राधान्य देऊन गाव निरोगी ठेवण्यासाठी आग्रही राहणार आहे. गावकऱ्यांचा विश्वास सार्थ करू, असे सरपंच जालिंदर गागरे यांनी सांगितले. याची चर्चा महाराष्ट्रात होत आहे.

 

हेही वाचा...

जिल्हा बॅंक नगरची कामधेनू : तांबे 

संगमनेर : "सहकाराचा जिल्हा असलेल्या नगरची जिल्हा बॅंक कामधेनू आहे. ही बॅंक मागील पिढीच्या धुरिणांनी राजकारणविरहित सांभाळली. तीच परंपरा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जोपासली आहे. जिल्हा बॅंकेत समविचारी नेत्यांना एकत्र घेत शेतकरी व सर्वसामान्यांचा विकास हेच ध्येय ठेवून काम होत आहे,'' असे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले. 

जिल्हा बॅंकेवर ऍड. माधवराव कानवडे व गणपतराव सांगळे यांची बिनविरोध निवड झाल्याने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर अमृत उद्योगसमूहातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी डॉ. तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर होते. 

तांबे म्हणाले, ""सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले, आबासाहेब निंबाळकर, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे यांच्यासह त्या काळातील नेत्यांनी जिल्हा बॅंक काटेकोर नियोजनाने जोपासली. सर्वसामान्य माणूस व शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केले. बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा बॅंकेत समविचारी नेत्यांना एकत्र घेऊन "सहकारात राजकारण करायचे नाही' हा संदेश दिला. जिल्हा बॅंक निवडणुकीत थोरातांनी शांत व संयमाने केलेली व्यूहरचना यशस्वी ठरली.'' 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख