सरपंच निवड "बिनविरोध'ने कमावले अन्‌ "पळवापळवी'ने गमावले  - Sarpanch election was won by 'Binvirodh' and lost by 'Palvapalvi' | Politics Marathi News - Sarkarnama

सरपंच निवड "बिनविरोध'ने कमावले अन्‌ "पळवापळवी'ने गमावले 

सुनील गर्जे
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

बिनविरोधच्या आदर्शाची परंपरा असलेल्या, बिनविरोध निवडून आलेल्या सर्व सदस्यांसह नेत्यांनी आज होणाऱ्या सरपंच निवडीत एकमताने सरपंच- उपसरपंचांची निवड करून देवसडेचे नाव जिल्ह्यात पुन्हा उंचवावे.

नेवासे : ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संपूर्ण गावाने अनोखा एकोपा दाखवून तालुक्‍यातच नव्हे, तर जिल्ह्यात लौकिक कमावला. देवसडेत सरपंचपदाचे आरक्षण घोषित झाल्यानंतर मात्र इच्छुकांचा नूर पालटला. सदस्य पळवापळवीचा प्रकार घडल्याने देवसडेत निवडणूक "बिनविरोध' करून कमावले; मात्र "पळवापळवी'ने गमावले, अशी चर्चा रंगली. 

बिनविरोधच्या आदर्शाची परंपरा असलेल्या, बिनविरोध निवडून आलेल्या सर्व सदस्यांसह नेत्यांनी आज होणाऱ्या सरपंच निवडीत एकमताने सरपंच- उपसरपंचांची निवड करून देवसडेचे नाव जिल्ह्यात पुन्हा उंचवावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. 

कृषी, धार्मिक, तसेच राजकीयदृष्ट्या समृद्ध समजल्या जाणाऱ्या देवसडे गावाला दहा वर्षांपासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे. या गावाने ही परंपरा कायम ठेवत तालुक्‍यात आदर्श निर्माण केला. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण महिलेसाठी घोषित होताच गावातील राजकीय गटातटांची प्रतिष्ठा उफाळून आली. बिनविरोधने एकसंध असलेल्या या गावात अंतर्गत मतभेद टोकाला गेले. यातूनच एका गटाने गावाबाहेरील एकाला "पॅकेज' देत, नऊ सदस्यांपैकी पाच जण "सहली'च्या गोंडस नावाखाली चक्क पळवून नेल्याने ग्रामस्थांत मोठी खळबळ उडाली. राजकीय एकोप्यास यामुळे तडा गेला असून, गावाच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

दरम्यान, तालुका, तसेच जिल्हा पातळीवरील राजकीय, सामाजिक व सहकार 
क्षेत्रात ठसा उमटवलेल्या बबनराव पिसोटे, बाळासाहेब उगले आदी दिग्गजांच्या देवसडे गावात बाहेरील व्यक्तीचा आधार घेऊन सदस्यांची पळवापळवी झाल्याने, गावाच्या समझोत्यास गालबोट लागल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकाराबाबत महाराष्ट्रात चर्चा होऊ लागली आहे.

अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त व्हावा 

गावपातळीवरील दोन राजकीय गटांतील मतभेदांचा गैरफायदा घेऊन दहशतीच्या जोरावर, "पॅकेज' देऊन व सदस्यांची पळवापळवी करून गावातील एकोप्याला खोडा घालणाऱ्यांचा बंदोबस्त हा त्या-त्या गावानेच करणे महत्त्वाचे ठरेल. लोकशाहीलाच आव्हान देण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने व या लोकांच्या दहशतीमुळे तक्रार करण्यास कोणी धजावत नसल्याने, निवडणूक आयोग, पोलिस यंत्रणा याची गंभीर दखल घेऊन अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करतील काय, याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख