`त्या` निर्णयाने जामखेडमधील 87 गावांमधील सरपंच तणावमुक्त !

इतर तालुक्यांतील गावांमध्ये सरपंच, तलाठी व संबंधित यंत्रणा बाहेरील लोकांमुळे हतबल झाली असताना जामखेड तालुक्यातील गावांतील पदाधिकारी मात्र खुष आहेत. गावात बाहेरील व्यक्ती येणारच नसल्याने गावांवरील मोठा ताण कमी झाला आहे.
sarpanch.jpg
sarpanch.jpg

जामखेड : तालुक्यातील बाहेरून येणाऱ्या 87 गावातील नागरिकांना जामखेड व खर्डा येथे क्वारंटाईन करण्याचा धाडसी निर्णय तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी घेतला आणि या निर्णयाचे ग्रामीण भागातून जोरदार स्वागत झाले. इतर तालुक्यांतील गावांमध्ये सरपंच, तलाठी व संबंधित यंत्रणा बाहेरील लोकांमुळे हतबल झाली असताना जामखेड तालुक्यातील 87 गावांतील 58 सरपंच व गावांतील पदाधिकारी मात्र खुष आहेत. गावात बाहेरील व्यक्ती येणारच नसल्याने गावांवरील मोठा ताण कमी झाला आहे. दरम्यान, असा निर्णय होणारा जामखेड हा राज्यातील पहिला तालुका ठरला आहे. 

जामखेड मागील दोन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात चर्चेत आले आहे. येथे एकामागून एक सतरा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जामखेड शहर तब्बल दोन महिने 'हॉटस्पॉट' राहिले. या काळात सर्व व्यवहार बंद राहिले. जामखेड बंद राहिले. त्यामुळे प्रत्येकाला या बंदच्या 'झळा' सोसाव्या लागल्या. लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी एकजुटीने संघर्ष केला. कोरोनाची वाढती संख्या रोखण्यासाठी प्रशासनाने सर्वोतपरी उपाययोजना केल्या. आमदार रोहित पवार हे देखील प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. जनतेलाही त्यांची मोलाची मदत आणि साथ मिळाली. त्यांनी संपूर्ण तालुक्यात निर्जंतुकीकरणाच्या फवारणीसाठी आवश्यक रसायने पुरविली. तालुक्यातील सर्व गावांमध्ये तीन वेळा निर्जंतुकीकरणाच्या फवारण्या झाल्या. त्यामुळे तालुका भयमुक्त झाला. 

बंदच्या काळामध्ये नागरिकांनी अत्यावश्यक सेवा वगळता घराच्या बाहेर पडू नये, असे आदेश प्रशासनाने दिल्यामुळे हातावरचे पोट असणारे लोक अडचणीत आले. त्यांना आमदार रोहित पवार यांनी स्वतः अन्नधान्य, कांदा-बटाटे, किराणा साहित्याचा पुरवठा केला. समाजातील दानशूर व्यक्तींनी अन्नधान्य व अन्नछत्र चालवण्याचे काम केले. ऐवढेच नाही, तर जनजागृतीसाठी आमदार पवार यांनी निरनिराळे 'फंडे' राबविले.
दुसऱ्या बाजूला प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले. आरोग्य विभाग, पोलीस विभाग, नगरपालिका,पंचायत समिती, शिक्षण विभाग, क्रषी विभागाला बरोबर घेऊन एकत्रित गुंफण्याचे काम तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले. एवढ्यावरच न थांबता तालुक्यांमध्ये यापुढील काळात रुग्ण आढळला नको, याकरिता तहसीलदार नाईकवाडे यांनी प्रांताधिकारी अर्चना नष्टेंच्या मार्गदर्शनाखाली स्वतःची स्वतंत्र नियमावली बनवली. मुंबई- पुण्यासह राज्याच्या विविध भागातून जामखेडला येणाऱ्या नागरिकांना ग्रामीण भागामध्ये त्यांच्या मूळगावी क्वारंटाईन करण्याऐवजी जामखेड शहरांमध्ये दोन माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीमध्ये क्वारंटाईन करण्याचा महत्वकांक्षी निर्णय  घेतला. हा निर्णय महत्तवपूर्ण ठरला.

गावांतील सरपंच बिनधास्त

जिल्ह्यातील इतर गावांमध्ये मुंबई-पुण्याहून लोक येत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. बाहेरून आलेले हे लोक स्थानिक पदाधिकाऱ्यांचेही एेकत नाही. शाळांमध्ये क्वारंटाईन केले, तरी रात्री घरी जात असल्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे सरपंच, तलाठी, संबंधित अधिकारी त्रस्त आहेत. असे असताना जामखेड तालुक्यात मात्र हा प्रकार दिसून येत नाही. बाहेरील जिल्ह्यातून आलेला कोणताही नवीन व्यक्ती आधी तालुकापातळीवरील क्वारंटाईन होण्यासाठी केंद्रात भेट देतो. त्यामुळे गावाकडे तो जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व गावांवरील तणाव पूर्णपणे कमी झाला आहे. हा पथदर्शी प्रयोग राज्यभरात राबविण्याची गरज असल्याचे मत अधिकारी वर्गातून व्यक्त होत आहे.  

प्रशासनाने खूप मोठा ताण वाचविला : सरपंच

लाॅकडाऊन शिथिल झाल्यामुळे परजिल्ह्यातून गावात लोक येवू लागले आहेत. परंतु प्रशासनाने जामखेडमध्येच त्यांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतल्याने आम्हाला गावात या लोकांना ठेवण्याचा प्रश्न मिटला. शिवाय वादही टळले. यामुळे आम्ही कोरोना वारिअर बिनधास्त झालो आहोत, असे मत मोहा गावचे सरपंच सारिका डोंगरे यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com