Sangamner's five corona positive | Sarkarnama

नगरने पन्नाशी गाठली : संगमनेरचे पाच कोरोना पाॅझिटिव्ह

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 8 मे 2020

संगमनेर तालुक्‍याचे "हॉट स्पॉट' संपत नाही, तोच आज अचानक पाच कोरोनाबाधित रुग्णांची आणखी भर पडली. त्यामुळे संगमनेर पुन्हा एकदा हादरले आहे. आजच्या अहवालात संगमनेरमधील एक महिला, तर धांदरफळ येथील दोन पुरुष व दोन महिला कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. 

नगर : कोरोनाबाबत जिल्ह्याचा प्रवास "ऑरेंज'कडून "ग्रीन' झोनकडे होत असताना, आज संगमनेर तालुक्‍याने चांगलाच "शॉक' दिला. जिल्हा रुग्णालयातर्फे पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या 34 नमुन्यांपैकी संगमनेर येथील तब्बल पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांत तीन महिलांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने आता अर्धशतक गाठले आहे. 
संगमनेर तालुक्‍याचे "हॉट स्पॉट' संपत नाही, तोच आज अचानक पाच कोरोनाबाधित रुग्णांची आणखी भर पडली. त्यामुळे संगमनेर पुन्हा एकदा हादरले आहे. आजच्या अहवालात संगमनेरमधील एक महिला, तर धांदरफळ येथील दोन पुरुष व दोन महिला कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. 

दरम्यान, काल (गुरुवारी) संगमनेर येथे मृत्यू झालेल्या वृद्धाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. धांदरफळ येथील आज बाधित आढळून आलेले रुग्ण या मृताच्या नात्यातील आहेत. संगमनेर येथील महिलेला (वय 49) न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. त्या वेळी तिच्या घशातील स्त्राव पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविला होता. त्यात ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. धांदरफळ येथील बाधितांमध्ये 29 वर्षांचा पुरुष व 15 वर्षीय मुलगा, तसेच 25 वर्षांची महिला व 19 वर्षांच्या तरुणीचा समावेश आहे. या पाचही जणांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध प्रशासन घेत आहे. 
दरम्यान, आज 23 अहवाल "निगेटिव्ह' आले. त्यांत धांदरफळ येथील 8, संगमनेरचे 4, श्रीरामपूर 3, पारनेर, राहाता, अकोले, कोपरगाव येथील प्रत्येकी एक, तर जामखेड, नगर येथील प्रत्येकी दोन अहवाल आहेत. पाच अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांपैकी 34 जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा...

धांदरफळ बुद्रुक "सील'

संगमनेर : तालुक्‍यातील धांदरफळ बुद्रुक येथील 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. गावात प्रवेश करणारे रस्ते बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आले आहेत. 
संगमनेरपासून सुमारे 12 किलोमीटरवरील धांदरफळ बुद्रुकची लोकसंख्या अवघी साडेपाच हजार आहे. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे व पोलिस उपअधीक्षक रोशन पंडित यांच्यासह अधिकाऱ्यांनी पथकांसह गावात जाऊन गावाच्या सर्व परिसरात प्रवेश करणारे आणि अंतर्गत रस्तेही बॅरिकेड उभारून बंद केले. 
दरम्यान, अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत त्या वृद्धाचा दफनविधी झाला. मृत व्यक्तीच्या निकटच्या संपर्कात आलेल्या दोन खासगी डॉक्‍टरांसह 24 जणांना तपासणीसाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गावातील 323 घरांमधील एक हजार 629 ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी सांगितले. मृताच्या घशातील स्वॅब पुन्हा तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवला असून, त्याचा अहवाल उद्या येण्याची शक्‍यता आहे. 

संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणा? 
दरम्यान, या वृद्धाच्या घशातील स्रावाचा नमुना मुंबईच्या खासगी प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर रुग्ण व नातेवाईक धांदरफळला गेले. या रुग्णाचा प्रवास खासगी रुग्णालयातून ग्रामीण रुग्णालयापर्यंत आणि तेथून धांदरफळपर्यंत झाला. त्यामुळे त्यांच्या संपर्कात नेमके किती लोक आले, याबाबत शंका आहे. या रुग्णाचा गुरुवारी सकाळी सात वाजता मृत्यू झाल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास प्रशासनाच्या हाती मुंबईच्या प्रयोगशाळेचा अहवाल आला. दरम्यानच्या काळात धांदरफळ, संगमनेर शहर, साकूर, खंदरमाळ, पिंपळगाव देपा, सारोळे पठार येथील नातेवाइकांसह परिसरातील रहिवाशांनी मृताचे अंत्यदर्शन घेतल्याचे समजते. मृत व्यक्तीचा गावात अंडीविक्रीचा व्यवसाय होता. संगमनेर शहरातही ते घरपोच सेवा देत होते. त्यांच्या संपर्कातील, तसेच मृत्यूनंतर अंत्यदर्शन घेतलेल्या लोकांचा शोध घेण्याचे आवाहन प्रशासनापुढे आहे. मात्र, या रुग्णाची लक्षणे संशयात्मक वाटत असतानाही ग्रामीण रुग्णालयाने त्याला दाखल करून न घेता घरी का जाऊ दिले? हा हलगर्जीपणा झाल्याचे आता पुढे आले आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख