नगर जिल्हा बॅंकेत पगार जमा होतोय, मग हे वाचाच ! - Salary is being deposited in Nagar District Bank, then read this! | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्हा बॅंकेत पगार जमा होतोय, मग हे वाचाच !

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

सर्व पगारदार खातेदारांसाठी बॅंकेने वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी घेण्याचा निर्णय घेतला आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाच्या सभेत हा निर्णय झाला

नगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने यापूर्वी शेतकऱ्यांना विविध कर्ज व सवलत देऊन शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. आता या बॅंकेत पगार जमा होणाऱ्या सर्व पगारदार खातेदाराच्या हिताचा जिल्हा बॅंकेने मोठा निर्णय घेतला आहे. 

सर्व पगारदार खातेदारांसाठी बॅंकेने वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी घेण्याचा निर्णय घेतला आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाच्या सभेत हा निर्णय झाला. याबाबत बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, उपाध्यक्ष रामदास वाघ यांनी माहिती दिली आहे. 

जिल्हा बॅंकेत शासकीय, निमशासकीय पगारदार नोकरांची मोठ्या प्रमाणावर पगाराची खाती आहेत. या खातेदारांना बॅंकेमार्फत वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. याबाबत लवकरच विमा कंपन्यांशी चर्चा करून या खातेदारांना विमा पॉलिसी लागू करणार आहे.

गृहकर्जही देणार

पगारदार नोकरांसाठी वैयक्तिक गृहकर्ज योजनेंतर्गत महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीत 25 लाख रुपये व मोठ्या ग्रामपंचायत हद्दीत 15 लाखांपर्यंतचे कर्ज बॅंकेतर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच, त्यांना व्यक्तिगत वापरासाठी दुचाकी व चारचाकी वाहन कर्जही बॅंकेकडून उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती गायकर यांनी दिली. गृहकर्ज, वाहनकर्ज या वैयक्तिक कर्जांचा लाभ नोकरदारांनी घेण्याचे आवाहन बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी केले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख