साईबाबांची मूर्ती विमानाने दिल्लीला, विमानतळावर कार्गोसेवा सुरू - Sai Baba's idol carries car to Delhi, cargo service at the airport | Politics Marathi News - Sarkarnama

साईबाबांची मूर्ती विमानाने दिल्लीला, विमानतळावर कार्गोसेवा सुरू

सतीश वैजापूरकर
गुरुवार, 25 मार्च 2021

शिल्पकारांनी तयार केलेली साईबाबांची संगमरवरी मूर्ती विमानाने दिल्लीला पाठवून आज सायंकाळी सहाच्या सुमारास येथील विमानतळावरून कार्गो सेवेस प्रारंभ झाला.

शिर्डी : येथील शिल्पकारांनी तयार केलेली साईबाबांची संगमरवरी मूर्ती विमानाने दिल्लीला पाठवून आज सायंकाळी सहाच्या सुमारास येथील विमानतळावरून कार्गो सेवेस प्रारंभ झाला.

या साईमुर्ती सोबत काही गृहपयोगी वस्तुही तिकडे धाडण्यात आल्या. नाशिक व औरंगाबाद औद्योगिक वसाहतीच्या दृष्टीने भविष्यात ही कार्गोसेवा वरदान ठरू शकेल. त्याचबरोबर महानगरात शेतमाल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही त्याचा लाभ होईल. 

नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींनी पुढाकार घेऊन या कार्गो सेवेचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून द्यायचे ठरविले. त्यासाठी व्यापारी आणि शेतकऱ्यांची सांगड घातली. महानगरात चांगले दर मिळू शकतो, असा शेतमाल हमीभाव देऊन खरेदी करण्याची शाश्वती मिळवून दिली, तर कदाचित शेतकऱ्यांना देखील या कार्गो सेवेचा लाभ होईल. अन्यथा केवळ व्यापारी व उद्योजकां पूरतीच ही सेवा लाभकारक राहील. 

सध्या पहिल्या टप्प्यात स्पाईस जेटसाठी कार्गो सेवेची परवानगी देण्यात आली आहे. काही दिवसात इंडिगो विमान कंपनीला देखील परवानगी मिळेल. तथापि, प्रवासी विमानापुरतीच ही सेवा मर्यादित आहे. सोळा मेट्रीक टन क्षमतेच्या वजनाची मालवहातूक करू शकणाऱ्या फ्रेटर फ्लाईटची कार्गो सेवा सुरू होण्यात आणखी काही कालावधी लागेल. त्यासाठी ही विमाने उभी करण्याच्या जागेवर काही बदल करावे लागतील. ही सेवा सुरू झाल्यानंतरच उद्योजक व शेतमालाच्या व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल.

आज सायंकाळी सहाच्या सुमारास शिर्डी ते दिल्ली या प्रवासी विमानात या सर्व वस्तू ठेवून कार्गो सेवेस प्रारंभ झाला. या वेळी विमानतळ संचालक दीपक शास्त्री, औद्योगिक सुरक्षा दलाचे अधिकारी दिनेश दहिवाडकर, प्रभात डेअरीचे सारंगधर निर्मळ, स्पाईस जेटचे राजन प्रभाकर, कार्गो व्यवस्थापक कृष्णा शिंदे, श्रीहरि अॅग्रोचे सागर भोंगळे आदी उपस्थित होते.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून पणन विभागाच्यावतीने शिर्डी विमानतळाजवळ फळे व भाजीपाला प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. हे केंद्र व कार्गो सेवा यांची सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन सांगड घालण्यात आली, तर उत्तर नगर जिल्ह्यातील उत्तम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा काही प्रमाणात लाभ होऊ शकेल.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख