साईबाबांचे दर्शन सोमवारपासून खुले ! संस्थानकडून तयारी पूर्ण - Sai Baba's Darshan open from tomorrow! Preparations completed by the institute | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

साईबाबांचे दर्शन सोमवारपासून खुले ! संस्थानकडून तयारी पूर्ण

सतीश वैजापूरकर
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

दर्शनाचे ऑनलाइन बुकिंग करताना विनाशुल्क व सशुल्क दर्शनासाठी रोज प्रत्येकी तीन हजार भाविकांचा कोटा असेल. सशुल्क दर्शनाचे दर पूर्वीप्रमाणेच असतील.

शिर्डी : यंदा आठ महिन्यांपासून भाविकांच्या दर्शनासाठी बंद असलेले साईसमाधी मंदिराचे दरवाजे पाडव्याच्या मुहूर्तावर उघडणार आहेत. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर साईसंस्थानच्या व्यवस्थापनाने सुधारित दर्शनव्यवस्थेचे नियोजन यापूर्वीच पूर्ण केले आहे. दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग बंधनकारक असेल. पहिल्या टप्प्यात दिवसाकाठी सहा हजार भाविकांना दर्शन घेता येईल. 

दर्शनाचे ऑनलाइन बुकिंग करताना विनाशुल्क व सशुल्क दर्शनासाठी रोज प्रत्येकी तीन हजार भाविकांचा कोटा असेल. सशुल्क दर्शनाचे दर पूर्वीप्रमाणेच असतील. दर्शनबारी व धर्मशाळांतील खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. दर्शनबारीत फवारणी केलेल्या औषधाचा प्रभाव तीन महिने टिकतो. तिरुपतीच्या धर्तीवर दर्शनबारीत ओझोननिर्मिती करून कोविड संसर्गावर नियंत्रण ठेवू शकणारी ट्रायझोन यंत्रणा साईसंस्थानदेखील खरेदी करणार आहे. दर्शन आणि निवासव्यवस्थेची तयारी यापूर्वीच पूर्ण झाली. साईसंस्थानचे प्रसादालय आशिया खंडात सर्वांत मोठे आहे. कोविड काळातील सुधारित भोजनव्यवस्था अद्याप करायची आहे. 

साईबाबा व्यवस्थापन मंडळाने केलेल्या नियोजनाची पाहणी साईसंस्थानच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी केली. त्यानुसार येथील दर्शनव्यवस्थेत आवश्‍यक ते बदलदेखील करण्याची तयारी केली आहे. गेल्या आठ महिन्यांत भाविक येत नसल्याने साईसंस्थानचे तब्बल पाचशे कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले. बाजारपेठ ठप्प झाल्याने शेकडो लोकांचा रोजगार बुडाला. येथील बाजारपेठेवर रोजीरोटी अवलंबून असलेल्या पाच हजारांहून अधिक छोट्या व्यावसायिकांनी येथून स्थलांतर केले. शिर्डीभोवतालच्या पंचवीस ते तीस गावांच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला. आता साईमंदिर पाडव्यापासून खुले होणार असल्याच्या बातमीमुळे शिर्डीकरांत उत्साह संचारला आहे. 

उशिरा घेतलेला निर्णय : विखे पाटील

राज्य सरकारने उशिरा का होईना, चांगला निर्णय घेतला. तिरुपती देवस्थान तीन महिन्यांपूर्वीच उघडण्यात आले. त्याच वेळी साईमंदिर खुले केले असते, तर साईसंस्थान व परिसराचे झालेले मोठे आर्थिक नुकसान कमी करता आले असते. राज्य सरकारने हा प्रश्‍न विनाकारण प्रतिष्ठेचा करून, राज्यातील मंदिरांवर रोजीरोटी अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या अडचणीत भर घालण्याचे काम केले, असे मत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

सरकारचा योग्य वेळी घेतलेला निर्णय : कोते

राज्य सरकारने साईमंदिर खुले करण्याच्या निर्णयाचे सर्वांनी खुल्या मनाने स्वागत करावे. हा योग्य वेळी घेतलेला निर्णय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करायला हवे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांनी व्यक्त केले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख