ग्रामस्थांची हाक साईबाबांनी ऐकली ! प्रशासन नरमले, विखे पाटीलांच्या मध्यस्थीला यश  - Sai Baba heard the call of the villagers! Administration softened, Vikhe Patil's mediation succeeds | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रामस्थांची हाक साईबाबांनी ऐकली ! प्रशासन नरमले, विखे पाटीलांच्या मध्यस्थीला यश 

सतीश वैजापूरकर
गुरुवार, 28 जानेवारी 2021

ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत सर्व मागण्या मान्य झाल्याने, शनिवारचा "बंद' तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बगाटे यांनी आज दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ती केली, तर ग्रामस्थांना सुलभपणे साईदर्शन घेता येईल.

शिर्डी : साईसंस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य केल्या, तसेच आजवर बंद ठेवण्यात आलेली साईबाबांची पालखी, दर गुरुवारची पालखी उद्यापासून सुरू करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत  काल उशिरा ग्रामस्थ व बगाटे यांच्यात झालेल्या चर्चेत, या मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे येत्या शनिवारी देण्यात आलेला "शिर्डी बंद'चा इशारा तूर्त स्थगित करण्यात आला, अशी माहिती माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी दिली. 

कोते म्हणाले, की या बैठकीस नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, डॉ. एकनाथ गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, प्रमोद गोंदकर, सचिन शिंदे आदी उपस्थित होते. त्यापूर्वी आमदार विखे पाटील व बगाटे यांच्यात स्वतंत्र चर्चा झाली. ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत सर्व मागण्या मान्य झाल्याने, शनिवारचा "बंद' तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बगाटे यांनी आज दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ती केली, तर ग्रामस्थांना सुलभपणे साईदर्शन घेता येईल.

साईमंदिर परिसराचे तीन व चार क्रमांकाचे दरवाजे खुले होतील. भाविकांसोबतचे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे हाल थांबतील. लिखापढी करून मंदिर परिसरात प्रवेश करण्याची जाचक अट मागे घेतली जाईल. पूर्वेकडील ओस पडलेल्या बाजारपेठेला काही प्रमाणात यामुळे जीवदान मिळेल. 

 

हेही वाचा..

के. के. रेंज सरावासाठी 23 गावांतील जमिनींचा वापर होणार

नगर : के. के. रेंज लष्करी सरावासाठी तीन तालुक्‍यांतील 23 गावांच्या जमिनींचे भूसंपादन लष्कराकडून होणार नाही; पण जमीनवापर होणार आहे. त्यामुळे या वापराचा मोबदला मिळावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यांनी ती नामंजूर केली आहे. त्यामुळे या मुद्द्यावर न्यायालयात जाता येऊ शकते व याच मुद्द्यावर मार्गदर्शन घेण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट आपण दिल्ली अधिवेशनाच्या काळात घेणार आहोत, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले. 

लष्कराच्या के. के. रेंज या सराव क्षेत्राच्या भूसंपादनावरून व त्याच्या श्रेयवादावरून राजकारण होत असल्याने, त्याला कंटाळून नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन, के. के. रेंजबाबतच्या एका मुद्द्याबाबत त्यांचे मार्गदर्शन घेण्याची तयारी दर्शविली आहे. खासदार डॉ. विखे यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. 

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, ""पारनेर, राहुरी व नगर या तीन तालुक्‍यांतील गावांचा हा प्रश्न आहे. पारनेरमधील 75 टक्के, राहुरीतील 55 टक्के व नगर तालुक्‍यातील 65 टक्के शेतकऱ्यांनी न्यायालयात हा विषय नेण्याच्या माझ्या भूमिकेला सहमती दाखविली आहे. के. के. रेंज भूसंपादनावरून मध्यंतरी गरजेपेक्षा जास्त राजकारण झाले. यातील काही गोष्टी सोडविण्याच्या मार्गावर मी होतो; पण शेतकऱ्यांपर्यंत व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून अफवा पसरविल्या गेल्या. त्यात मूळ प्रश्न मागे राहिला. त्यामुळे श्रेयवादात न पडता पवारांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटत असेल तर आपण तसे करू; पण या विषयाला पक्षीय रंग देणे योग्य नाही.'' 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख