नगर महापालिकेवर भगवाच फडकणार : शिवसेना नेत्यांना विश्वास - Saffron will hit the Municipal Corporation: Trust Shiv Sena leaders | Politics Marathi News - Sarkarnama

नगर महापालिकेवर भगवाच फडकणार : शिवसेना नेत्यांना विश्वास

मुरलीधर कराळे
रविवार, 6 जून 2021

महापौरपदाची मुदत येत्या 30 जूनला संपत आहे. त्यासाठी अद्याप निवडणूक प्रक्रिया सुरू झाली नाही, मात्र या पदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व कॉँग्रेसचे स्थानिक नेते दावा करीत आहेत.

नगर :,मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. नगर शहराच्या विकासासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे नियोजन आहे. ते कायम नगरकरांसाठी मदत करतात. गट-तट सर्वच पक्षात असतात, मात्र पक्षादेशापुढे या गोष्टी गौण असतात. येत्या एक जुलैला महापालिकेवर भगवाच फडकणार आहे. बाँडवर लिहून देतो, महापौर शिवसेनेचाच होईल, असा ठाम विश्वास शिवसेनेचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते (Dilip Satpute) यांनी `सकाळ`शी बोलताना व्यक्त केला. (Saffron will hit the Municipal Corporation: Trust Shiv Sena leaders)

महापौरपदाची मुदत येत्या 30 जूनला संपत आहे. त्यासाठी अद्याप निवडणूक प्रक्रिया सुरू झाली नाही, मात्र या पदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व कॉँग्रेसचे स्थानिक नेते दावा करीत आहेत. सर्वाधिक 23 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. निवडीसाठी जादुई आकडा गाठण्यासाठी त्यांना काही नगरसेवक कमी पडणार आहेत. याबाबत बोलताना सातपुते यांनी आपली भूमिका विशद केली.

ते म्हणाले, की आम्हाला कमी पडत असलेले नगरसेवक मिळविण्याची व्यवस्था झालेली आहे. त्यामुळे आम्हाला चिंता नाही. शहराच्या विकासासाठी यापूर्वीही शिवसेनेने मोठे योगदान दिले आहे. शिवसेनेला नगरकरांनी कायम साथ दिली आहे. अनेक वर्षे विधानसभेचे नेतृत्व शिवसेनेच्या आमदारांनी केले आहे. अनेक महत्त्वाची कामे शिवसेनेमुळेच मार्गी लागलेली आहेत. नगर शहरात विकासास मोठा वाव आहे. चांगले उद्योग नगरमध्ये हवे आहेत. त्यासाठी पूरक वातावरण हवे आहे. नागरी सुविधांसाठी नगरकरांना मोठ्या निधीची गरज आहे. शिवसेनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत. आमच्याकडे आरक्षणानुसार उमेदवार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचाच महापौर होणार आहे.

शिवसेनेतील गट-तटाबाबत बोलताना सातपुते म्हणाले, की शिवसेनेकडे जास्त नगरसेवक असताना मागील वेळी राजकीय घडामोडीत शिवसेनेला या पदापासून दूर राहावे लागले. शिवसेनेत गट-तट असल्याचा काही लोक गवगवा करीत असले, तरी प्रत्येक पक्षात गट-तट असतातच. इतर पक्षांचेही शहरात गट कमी नाहीत. असे असताना महत्त्वाच्या वेळी हे एकत्र येतात, हा इतिहास आहे. त्यामुळे हा विषय गौण आहे.

याबाबत मुख्यमंत्री किंवा संबंधित वरिष्ठांच्या काही सूचना आहेत काय, याबाबत बोलताना सातपुते म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितले आहे. महापौर शिवसेनेचाच करायचा. तसेच इतर वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा होत आहे. येत्या 24 तारखेला निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महापौर शिवसेनेचा होऊन महापालिकेवर भगवा फडकेल, असा विश्वास दिलीप सातपुते यांनी व्यक्त केला.

हेही वाचा...

महापाैराबाबत मोठे विधान

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख