Sadly ...! Her husband was kidnapped by Corona, now she too | Sarkarnama

दुःख असे की... ! पतीला कोरोनाने हिरावले, आता तिलाही कवटाळले

संजय आ. काटे
सोमवार, 25 मे 2020

मुंबई येथून दोन मुलांसह महिला तालुक्‍यातील एका गावात आली. त्यासाठी प्रवासाची रीतसर परवानगीही तिच्याकडे होती. मात्र, ती येथे पोचत नाही तोच मुंबईतून फोन आला, की "तुमचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहे..!'

श्रीगोंदे : मुंबई येथे पतीचे कोरोनाने निधन झाले. तिलाही क्वारंटाईन करण्यात आले. ते दिवसही संपले म्हणून आपल्या गावी श्रीगोंद्याकडे दोन चिमुरड्यांसह आली. पण मुंबईहून फोन आला. तुमचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह. कोरोनाने पतीला हिरावले, आता तिलाही कवटाळल्यामुळे दुःख पाठ सोडेना. तिला आता काळजी तिच्या दोन चिमुरड्या पाखरांची. 

नगरच्या रुग्णालयाकडून हेळसांड

मुंबई येथून दोन मुलांसह महिला तालुक्‍यातील एका गावात आली. त्यासाठी प्रवासाची रीतसर परवानगीही तिच्याकडे होती. मात्र, ती येथे पोचत नाही तोच मुंबईतून फोन आला, की "तुमचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहे..!' नंतर सगळ्यांचीच धांदल उडाली. येथील आरोग्य यंत्रणेने रातोरात त्यांना नगरला पाठविले. मात्र, जिल्हा रुग्णालयातून त्यांच्या घशातील स्राव न घेताच त्यांना परत पाठविले. त्यानंतर आज पुन्हा त्यांना नगरला हलविले आहे. 

नगर तालुक्‍याच्या सरहद्दीजवळच्या गावातील ही घटना मुंबई व नंतर नगरच्या जिल्हा रुग्णालयाची पोलखोल करण्यास पुरेशी आहे. भाईंदर (मुंबई) येथे या महिलेच्या पतीचे कोरोनामुळेच निधन झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली. त्यानंतर ही महिला काही दिवस मुंबईतच क्वारंटाईन केली होती. मात्र, काल (रविवारी) तालुक्‍यातील तिच्या गावी दोन मुलांसह परतली. रात्री ती आली आणि मागून फोन आला, की तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 

तिला पास मिळालाच कसा

कोरोनामुळे तिच्या पतीचे निधन झालेले असताना, तसेच महिलेचा अहवाल आलेला नसताना, ती श्रीगोंद्यात येऊच कशी शकते? धक्कादायक म्हणजे, संबंधित महिलेला 5 जूनपर्यंत क्वारंटाईन राहण्याचे आदेश प्रशासनानेच दिले होते, तरीही तिला प्रवासाचा पास कसा मिळाला? 

ही महिला येथे आल्यावर तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यानंतर डॉ. खामकर यांनी तातडीने रात्रीच तिच्यासह कुटुंब नगरला जिल्हा रुग्णालयात रवाना केले. मात्र, तेथेही त्यांच्या घशातील स्राव न घेता त्यांना परत पाठवून दिल्याचे आज सकाळी समजले. त्यानंतर बेलवंडीचे पोलिस निरीक्षक अरविंद माने व आरोग्य यंत्रणेने पुन्हा हे कुटुंब नगरला नेले. यंत्रणेच्या हाती ती महिला कोरोनाबाधित असल्याचा 22 मे रोजीचा अहवाल होता. असे असताना महिलेला प्रवासाची परवानगी कशी मिळाली, तसेच नगरला तपासणीही न करता तिला पुन्हा गावी का पाठविले, असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. 

ती स्थानिक नाही

मुंबईहून आलेली ही महिला कोरोनाबाधित असली, तरी ती स्थानिक नाही. त्यामुळे श्रीगोंद्यात अजूनही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही, असे तहसीलदार महेंद्र माळी यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख