बाजारात भेळ विकणारा रमेश सावंत झाला आरटीओ - RTO became the market seller | Politics Marathi News - Sarkarnama

बाजारात भेळ विकणारा रमेश सावंत झाला आरटीओ

वसंत सानप
शुक्रवार, 17 जुलै 2020

बाजारांमध्ये भेळ, शेवचिवडा तयार करून विकण्याचा. या व्यवसायात दोन्ही भावंडेही मदत करायची, ही कहाणी आहे दिघोळ (ता. जामखेड) येथील नुकताच आरटीओ इन्स्पेक्टर झालेल्या रमेश सावंत यांची.

जामखेड : पंधरा वर्षे खूप खडतर गेले. मिळेल ते कष्ट सोसले. वडील छगन रंगनाथ सावंत हे पाखलीमधून घरोघरी लोकांना पाणी पुरवण्याचे काम करायचे. आजोबांपासून हा व्यवसाय चालू  होता. पुढे वडिलांनी दुसरा व्यवसाय निवडला. बाजारांमध्ये भेळ शेवचिवडा तयार करून विकण्याचा. या व्यवसायात दोन्ही भावंडेही मदत करायची, ही कहाणी आहे दिघोळ (ता. जामखेड) येथील नुकताच आरटीओ इन्स्पेक्टर झालेल्या रमेश सावंत यांची.

यशासंदर्भात बोलताना रमेश सावंत म्हणाले, "आमची घरची परिस्थिती प्रचंड हालाकीची. दिघोळ या गावी राहायला घर देखील नव्हते. नंतर घर घेतले. कालांतराने आम्ही भावंडे मोठे होऊ लागलो, मी आणि माझा मोठा भाऊ अशोक. आम्ही दोघेही या व्यवसायात मदत करू लागलो. त्याचबरोबर माझी दहावी श्री हनुमान विद्यालय येथे पूर्ण झाली व पुढील शिक्षणासाठी मोठ्या जिद्दीने नगर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज येथे प्रवेश घेतला. परिस्थिती तशी जेमतेम पण न डगमगता भाऊ अशोक याने खंबीर साथ दिली व बारावी झाली. पण पुढे काय, याचा प्रश्न पडला व इंजिनिअरिंग करावे, अशी आमची इच्छा होती. पुणे येथे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. परिस्थिती तशी नाजूक होती, पण कुटुंबाने कर्ज काढून मला पैशाची कमी पडू दिली नव्हती. मध्यंतरी गावाकडे आल्यानंतर मी पण बाजारात बसून भेळ वडापाव विकायचो. किंबहुना मी ते आताही करत आहे, पण सध्या लॉकडाऊन मध्ये बाजार बंद आहेत. 

2016 मध्ये माझे इंजिनियरिंग पूर्ण झाले. कंपनीमध्ये नोकरी मिळाली होती. पगारही चांगला होता, पण मनात काहीतरी वेगळं करण्याची जिद्द होती व त्यानंतर एमपीएससी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यात मला मोलाची साथ म्हणजे मोठा भाऊ अशोक यांची मिळाली. त्याची इच्छा होती की मी वेगळं काहीतरी करावं. त्याला हा निर्णय सांगितल्यावर तो क्षणात हो म्हणाला. मी एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला पुण्यात अभ्यास चालू केला. मला मित्रांनी सल्ला दिला, की क्लास लाव फायदा होईल, पण माझी परिस्थिती तशी नव्हती की क्लास ची फी भरू शकेल. म्हणून मी सेल्फ स्टडी चालू केला.  2017 मध्ये एक्साईज इन्स्पेक्टर व आरटीओ इन्स्पेक्टरच्या परीक्षा दिल्या. याचबरोबर पीएसआय, राज्यसेवा या परीक्षा ही देत होतो. क्वालिफाय होत होतो. पण अंतिम यादीत नाव घेत नव्हते.

 2019 मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचलो होतो, पण मुलाखतीला पास झालो नव्हतो. असेच दिवस जात होते, यश काही केल्या येत नव्हते. एमपीएससी म्हणजे संयम आणि सातत्य, आहे हे मला उमगले होते. म्हणून प्रयत्न चालू होते. 

या वर्षी सर्वत्र लाॅकडाऊन असल्यामुळे बाजार बंद होता. त्यामुळे आमचे उत्पन्न बंद असल्यामुळे परिस्थिती एकदम हलाखीची झाली होती. असे असतानाच एक गोड बातमी आली की आरटीओ निरीक्षकाचा निकाल लागला आहे. छाती धडधडत होती, कापऱ्या हाताने यादी चेक केली. यादीत नाव तीन-चार वेळेस पाहिले व मन भरून आले. आई वडील व मुख्यतः मोठा भाऊ यांची पुण्याई कामी आली व अंतिम यादीत निवड झाली.
 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख