निघोज : पारनेर तालुक्यातील ऐतिहासिक दारुबंदीला लेखी विरोध करणाऱ्या त्या सात जणांना या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोधसाठी उमेदवारीची संधी देवू नका, अन्यथा आम्हाला महिलांसह दारुबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेवून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागेल, असा इशारा निघोजच्या महिलांनी दिला आहे. त्यामुळे या गावात बिनविरोध निवडणूक होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
गावची निवडणूक बिनविरोध होत असेल, तर आम्हाला आनंदच होईल. मात्र यासाठी दारुबंदीला विरोध करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवणार आहे, असा इशारा दारुबंदी चळवळीच्या प्रमुख कार्यकर्त्या कांता लंके यांनी दिला आहे.
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, अन् गावाला 25 लाखांचा निधी घ्या, असे जाहीर करुन पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला असून, निघोजच्या पुढाऱ्यांनाही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहमती दर्शविली असताना दारुबंदीचा विषय सध्या कळीचा मुद्दा ठरला आहे.
आमदार निलेश लंके यांनी निघोजची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उचलले पाऊल योग्य आहे. त्यांच्या बिनविरोध निवडणुकीला आमचा पांठिबा आहे. मात्र दारुबंदी हटविण्यासाठी गावातील ज्या सात जणांनी लेखी पुढाकार घेतला, अशा सात जणांना बिनविरोध निवडुन देवू नका, अशी भुमिका आता या महिलांनी घेतली आहे.
या सात जणांपैकी कोणालाही बिनविरोध निवडणुकीत सामील केले, तर आम्ही निवडणूक लढवू, असा इशारा देत आमदार निलेश लंके यांनीच यातून मार्ग काढावा, असे दारुबंदी चळवळीच्या महिला आघाडीच्या प्रमुख कांता लंके यांनी सांगितले.
दरम्यान, दारुबंदी चळवळीतील महिलांनी नेमके कोणत्या सात जणांना विरोध केला. हे सातजण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? निवडणूक बिनविरोध होणार का?याबाबत पारनेर तालुक्यासह जिल्ह्यात उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे महाराष्ट्रातील राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.
Edited By - Murlidhar Karale

