जामखेड : नुकत्याच कर्जत येथे झालेल्या एका कार्यक्रमात भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती. केवळ सोशल मीडियावर कार्यरत असणाऱ्या आमदारांनी काय कामे केली, असे ते म्हटले होते. या आरोपाला आमदार पवार यांनी कृतीतून उत्तर दिले आहे. कर्जत व जामखेड तालुक्यातील घरकुलांसाठी त्यांनी तब्बल 15 कोटी रुपयांचे अनुदान आणले असून, ते नुकतेच संबंधित खात्यात वर्ग झाले आहेत.
कर्जत नगरपंचायत येथील 657 घरकुल प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्याचे केंद्र शासन अनुदान मिळवून तीन कोटी 94 लक्ष 20 हजार इतके अनुदान कर्जत नगरपंचायतीच्या खात्यात वितरित करण्यात आले व जामखेड नगरपरिषद येथील एकूण 933 घरकुल प्रकल्पांसाठी राज्य शासन व केंद्र शासनाचे अनुदान मिळवून 11 कोटी 19 लक्ष 60 हजार इतके अनुदान वितरित करण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजनेचे जामखेड नगरपालिकेतील 933 लाभार्थी आहेत, तर कर्जत नगरपंचायतीतील 657 लाभार्थी आहेत. राज्य शासन व केंद्र शासनाकडील अनुदान शासन स्तरावर प्रलंबित होते.
याबाबत आमदार रोहित पवार यांनी ग्रहनिर्माण जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानुसार ता. 19 नोव्हेंबर 2020 रोजी प्रधान सचिव (गृहनिर्माण विभाग) यांच्याशी पत्रव्यवहार केला व ही थकीत अनुदान त्वरित वितरीत होणेबाबत प्रधान सचिव गृहनिर्माण यांनी तात्काळ दखल घेत संबंधित आवास योजनेचे कर्जत नगरपंचायत व जामखेड नगर परिषद हे प्रलंबित अनुदान वितरीत करण्याबाबत संबंधितांना आदेश दिले. ता. 24 रोजी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्या पत्रान्वये कर्जत नगरपंचायत येथील 657 घरकुल प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्याचे केंद्र शासन अनुदान मिळविले. तीन कोटी 94 लक्ष 20 हजार इतके अनुदान कर्जत नगरपंचायतीच्या खात्यात वितरित करण्यात आले. जामखेड नगरपरिषद येथील एकूण 933 घरकुल प्रकल्पांसाठी राज्य शासन व केंद्र शासनाचे अनुदान मिळवून 11 कोटी 19 लक्ष 60 हजार इतके अनुदान वितरित करण्यात आले असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.
Edited By - Murlidhar Karale

