रोहित पवार यांचे दबावतंत्र खपवून घेणार नाही : प्रा. राम शिंदे - Rohit Pawar's pressure system will not be tolerated: Prof. Ram Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

रोहित पवार यांचे दबावतंत्र खपवून घेणार नाही : प्रा. राम शिंदे

वसंत सानप
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

दबाव तंत्राचा आवलंब करुन नगरपालिका, पंचायत समितीत सत्तांतर घडविले, हे पवार घराण्याला शोभणारे नाही; तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहकारी संस्थांना राज्य शासनाने मुदत वाढ दिलेली असताना आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडच्या दोन्ही बाजार समित्यांवर प्रशासक नेमले.

जामखेड : "दबाव तंत्राचा आवलंब करुन नगरपालिका, पंचायत समितीत सत्तांतर घडविले, हे पवार घराण्याला शोभणारे नाही; तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहकारी संस्थांना राज्य शासनाने मुदत वाढ दिलेली असताना आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडच्या दोन्ही बाजार समित्यांवर प्रशासक नेमले. त्यांच्याकडून सुरु असलेले दबावतंत्राचे राजकारण यापुढे सहन केले जाणार नाही, येथील जनता त्यांनी वेळीच धडा शिकवेल, असे प्रतिपादन माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या वर्षपूर्तीनंतर जामखेड तालुक्याने काय कमावले? काय गमावले? या विषयावर माजी मंत्री राम शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, भाजपचे तालुकाध्यक्ष अजय काशीद, जिल्हासरचिटणीस अॅड. प्रविण सानप, युवकाध्यक्ष शरद कार्ले, शहराध्यक्ष बिभिषण धनवडे, गौतम उतेकर, सोमनाथ राळेभात, लहू शिंदे अदिंसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थितीत होते.

वर्षभरात एकाही कामाला मंजुरी नाही

या वेळी माजी मंत्री शिंदे म्हणाले, " वर्षभराचा कालवधी गेला, राज्यात सत्तांतर होऊन महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. कर्जत-जामखेड मतदारसंघात ही परिवर्तन होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार लोकप्रतिनिधी झाले. मात्र वर्षभराचा काळात तालुक्यात एकाही विकास कामाला मंजुरी मिळाली नाही, नवीन काम सुरू झाले नाही. उलट सुरू असलेली कामे थांबवली. तसेच आम्ही मंजूर करुन सुरू केलेल्या विकास कामांचा दुबार नारळ वाढवून प्रारंभ करण्याचा केविलवाणा प्रकारही त्यांनी केला. कामाचा प्रारंभ करण्यासाठी आई-वडील हे देखील पुढे येत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून आवश्यक तो प्रोटोकाॅलही पवारांकडून पाळला जात नाही, अशी टिका आमदार रोहित पवारांवर केली. तसेच कोरोनाच्या काळात जामखेड येथे डॉ. आरोळे संचलित ग्रामीण आरोग्य प्रकल्पा अंतर्गत सुरु असलेले कोवीड सेंटर हे स्वतःच्या पुढाकाराने सुरु असल्याचे लोकप्रतिनिधींनी भासवले. प्रत्यक्षात विविध दात्रुत्व संपन्न व्यक्ती, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हे सेंटर चालले. स्वतः मात्र कोवीड सेंटर सुरू केले नाही. तसेच कोरोनाचा काळात योजना राबविण्याकरिता अडचण असल्याचे लोकप्रतिनिधीकडून सांगितले जाते, मात्र स्तःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जिल्हापरिषद शाळेतील मुलांना दोन दोन तास ताटकळत ठेवण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केले. 144 कलमाचे उल्लंघन केले. अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करणे हे लोकप्रतिनिधीला अशोभनीय आहे. तसेच सोशल मीडीयाच्या माध्यमातून दिशाभूल करण्याच काम लोकप्रतिनिधींनी केले आहे.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख