रोहित पवारांची नवीन वर्षाची सुरुवात श्रमदानाने - Rohit Pawar's New Year begins with hard work | Politics Marathi News - Sarkarnama

रोहित पवारांची नवीन वर्षाची सुरुवात श्रमदानाने

वसंत सानप
रविवार, 3 जानेवारी 2021

आरोळे हॉस्पिटलच्या आवारात ‘स्वच्छ सर्वेक्षणां’ अंतर्गत स्वच्छतेच्या कामासाठी पुढाकार घेऊन तब्बल दोन तास श्रमदान केले. त्यांनी याकामी पुढाकार घेऊन जामखेडकरांना श्रमदानासाठी योगदान करण्याची प्रेरणा दिली.

जामखेड : मतदारसंघाच्या विकासाबरोबरच शहराचा व नागरिकांचा गुदमरलेला श्वास मोकळा व्हावा, आपलं शहर स्वच्छ व सुंदर असावं, हा मंत्र घेऊन नवीन वर्षाचे स्वागत आमदार रोहित पवारांनी अनोख्या पध्दतीने केले.

येथील आरोळे हॉस्पिटलच्या आवारात ‘स्वच्छ सर्वेक्षणां’ अंतर्गत स्वच्छतेच्या कामासाठी पुढाकार घेऊन तब्बल दोन तास श्रमदान केले. त्यांनी याकामी पुढाकार घेऊन जामखेडकरांना श्रमदानासाठी योगदान करण्याची प्रेरणा  दिली.

आमदार रोहित पवार गेली वर्षभरापासून दोन्ही तालुक्यातील रखडलेल्या योजनांना गती मिळावी ; तसेच मतदारसंघाची ओळख राज्यात निर्माण व्हावी, यासाठी काम करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे जामखेड व कर्जत हे दोन्ही शहर स्वच्छ व सुंदर व्हावेत, हरवलेले शहरपण पुन्हा प्राप्त व्हावं, येथील गुंडगिरीला आळा बसावा, नागरिकांना शिस्त लागावी, वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालण व्हावे, शहरासह येथील नागरिकांची होणारी मुस्कटदाबी, गुदमरलेला श्वास मोकळा व्हावा, कायदा सुव्यवस्था चोख रहावी, शहराला वरदान ठरलेल्या नद्या स्वच्छ व सुंदर होऊन वहात्या व्हाव्यात, यासाठी जाणीपूर्वक काम करीत आहेत. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडचा दौरा केला आणि विविध कार्यक्रमांबरोबरच 'श्रमदाना' च्या माध्यमातून आपले योगदान दिले. 

डॉ. शोभा आरोळे आणि रवी आरोळे, युवक व कार्यकर्ते यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून या परिसराची स्वच्छता केली. नवीन वर्षाचे अनोख्या पध्दतीने स्वागत केले. श्रमदानासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे आणि आपल शहर स्वच्छ, सुंदर ठेवावे. आपले आरोग्य चांगले ठेवावे, हाच संदेश आपल्या कृतीतून दिला.

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख