कर्जत : कर्जत व जामखेडला जोडणारे रस्ते डांबरीकरण नव्हे, तर थेट काॅंक्रिटीकरण करण्याची गळ आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना घातली. त्यावर गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे पवार यांनी म्हटले आहे.
नगर-बीड आणि श्रीगोंदा-जामखेड ते बीड हे प्रमुख मार्ग कर्जत-जामखेड या मतदारसंघातून जातात. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. या मार्गाचे काँक्रीटीकरण केल्यास त्याचा या भागातील अनेक गावांच्या विकासासाठी मोठा फायदा होणार आहे. त्यासाठीही आमदार रोहित पवार यांनी गडकरी यांना गळ घातली.
भूम, जामखेड, नगरचे अर्थकारण वाढणार
आंध्रप्रदेशातून शिर्डी येथे दर्शनासाठी जाणारे भाविक पूर्वी भूम, जामखेड, नगर या मार्गाने जात असत. मात्र गेल्या काही वर्षात हा रस्ता खराब असल्याने या मार्गाने येणाऱ्या भाविकांची संख्या घाटली आहे. त्यामुळे हा रस्ता चांगला झाला आणि भूमच्या बाजूनेही तो दुरुस्त केला गेला, तर या तिन्ही तालुक्यात अर्थकारण वाढून त्यांचा विकास होण्यास मदत होईल. तसेच प्रत्येक महामार्गावर हॉटेल व इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक युवांना प्राधान्य देण्याचीही गरज आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.
खर्डा ते कुर्डुवाडी रस्त्यासाठी साकडे
पैठण ते पंढरपूर या पालखी महामार्गावरील खर्डा हे ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या महत्वाचे स्थान आहे. संत एकनाथ महाराज, संत भगवानबाबा, संत गोरा कुंभार यांच्या पालख्यांसह असंख्य वारकरी या मार्गाने पंढरपूरला जात असतात. त्यामुळे खर्डा ते कुर्डूवाडी हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. तो पूर्णत्वास नेल्यास सोलापूर, नगर हे जिल्हे जोडले जातीलच, शिवाय इथल्या विकासालाही मोठा हातभार लागेल आणि वारकऱ्यांचीही गैरसोय होणार नाही. त्याचबरोबर नगर-करमाळा-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरी करण्याचे काम भारतमाला प्रकल्पांतर्गत प्रस्तावित आहे.
रस्ते काॅंक्रेटिकरण व्हावे
सध्या वाहतुकीसाठी बाह्यवळण मार्गाऐवजी नागरिक इतर रस्त्यांना प्राधान्य देत आहेत, तेव्हा शहरी भागातील या रस्त्यांचेही काँक्रिटीकरन करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्ग ६१ जवळच्या नगर आणि करमाळा, टेम्भूर्णी, परिटी, करकंब, पंढरपूर, मंगळवेढा या भागांना जोडून कर्नाटकातील विजापूरजवळ महामार्ग ५२ ला समाप्त होणारा महामार्ग या रस्त्यांच्या चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण व राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून सुरु आहे. राज्यात हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. हा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून, त्याचे लवकरात लवकर चौपदरीकरण होणे महत्त्वाचे आहे, याकडेही त्यांनी गडकरी यांचे लक्ष वेधले. तसेच श्रीगोंदा-जामखेड मार्गाच्या विकासाबाबतही सकारात्मक चर्चा झाली आणि येणाऱ्या अंदाजपत्रकात त्यासाठी भरीव तरतूद केली जाईल, असा विश्वास वाटतो.
नगर ते बीड रस्त्याच्या प्रश्नावरही चर्चा
नगर ते बीड राष्ट्रीय महामार्ग ५६१ हा चिंचोडी पाटील, धानोरे, कडा, आष्टी व जामखेड या शहरी भागासह अनेक दुर्गम भागांना जोडला जातो, त्यामुळे या रस्त्यासाठी बजेटमध्ये भरीव तरतूद करण्याची मागणी करतानाच या मार्गाचा विकास आराखडा संबंधित विभागाकडे असून, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यामध्ये नगर ते धानोरा, धानोरा ते जामखेड, जामखेड ते रोहतवाडी- चुंबळी फाटा आणि रोहतवाडी ते बीड या मार्गांचा समावेश आहे. नगर, जामखेड व बीड या प्रमुख ठिकाणांना जोडणारा हा मार्ग असल्याने आगामी बजेटमध्ये या रस्त्यांसाठी अपेक्षित निधी मिळेल, अशी अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

