नगराध्यक्षांना ठेकेदाराकडून मलिदा, उपनगराध्यक्ष निखाडे यांचा पलटवार - Retaliation of Malida, Deputy Mayor Nikhade from the contractor to the Mayor | Politics Marathi News - Sarkarnama

नगराध्यक्षांना ठेकेदाराकडून मलिदा, उपनगराध्यक्ष निखाडे यांचा पलटवार

मनोज जोशी
सोमवार, 1 मार्च 2021

2014च्या विधानसभा निवडणुकीतील वहाडणे यांचा खरा हिशेब सांगितला, तर त्यांना फिरणे मुश्‍कील होईल. आमच्याकडे सर्व पुरावे असून, वहाडणे यांची तयारी असल्यास भर चौकात सोक्षमोक्ष लावण्यास आम्ही तयार आहोत.

कोपरगाव : "राजकारणात स्वतःचे कर्तृत्व शून्य असताना, 30 वर्षांच्या कारकिर्दीत केवळ बेताल, बेछूट आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले. पाणीयोजनेचे काम पूर्ण झाल्याशिवाय ठेकेदारास अंतिम बिल देऊ नये, असे ठराव सर्वसाधारण सभेत केल्यावरही त्यांनी तीन कोटींचे बिल काढले. त्यात ठेकेदाराने त्यांनाच मलिदा दिला असेल,'' असा थेट आरोप भाजपचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी केला. 

नगराध्यक्ष वहाडणे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन नगरसेवकांनी गैरव्यवहार केल्याचा पाढा वाचला. त्यावर उत्तर देताना निखाडे म्हणाले, "पाणीयोजनेचे ठेकेदार विजय कन्स्ट्रक्‍शनचे बिल न देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे 11 वेळा विरोध केला. केवळ विरोध करतो म्हणून माझा आवाज दाबण्यासाठी वहाडणे खोटे आरोप करतात.'' नगरसेवक विजय वाजे म्हणाले, ""नगराध्यक्ष हेतुपुरस्सर माझ्या प्रभागात कामे करीत नसल्याने मला स्वखर्चाने परस्पर कामे करावी लागतात.'' 

हेही वाचा... गडकरींनी दिले रस्त्यांसाठी 35 कोटी

शिवसेनेचे योगेश बागूल म्हणाले, ""भ्रष्टाचाराचा वास येत असलेल्या कामांना बहुमताच्या जोरावर आम्ही विरोध केला. त्यामुळे वहाडणे यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, ज्या कामात भ्रष्टाचार होत असेल, तेथे बहुमताचा हिसका यापुढेही दाखवणारच.''

कैलास जाधव म्हणाले, ""माझे कुठेही अतिक्रमण नसून, संबंधित जागा विकत घेतली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासमक्ष शपथा घेऊन नगराध्यक्षच भ्रष्टाचार करीत आहेत.'' 

माजी नगराध्यक्ष संजय सातभाई म्हणाले, ""वहाडणे यांनी केलेले, नजरेत भरेल असे एखादे काम जनतेला दाखवावे. गिरमे परिवाराच्या जागेचा उल्लेख वहाडणे करीत आहेत, ती जागा प्रत्यक्ष गुजराथी यांच्या नावावर आहे. बेताल आरोप करून केवळ भांडणे लावण्याचे काम करू नये.'' 

हेही वाचा... ग्रामसभेत दोन गट भिडले

दरम्यान, या प्रकाराची चर्चा आता महाराष्ट्रभर रंगू लागली आहे. नगराध्यक्ष वहाडणे यांनी केलेल्या आरोपाला नगरसेवकांनी उत्तर दिल्याने हा वाद-प्रतिवाद रंगू लागला आहे.

तर त्यांना फिरणेही मुश्किल होईल

2014च्या विधानसभा निवडणुकीतील वहाडणे यांचा खरा हिशेब सांगितला, तर त्यांना फिरणे मुश्‍कील होईल. आमच्याकडे सर्व पुरावे असून, वहाडणे यांची तयारी असल्यास भर चौकात सोक्षमोक्ष लावण्यास आम्ही तयार आहोत. गेल्या 25 वर्षांपासून आम्ही कायदेशीर कर भरून व्यवसाय करतो. आरक्षण हटवून, भिश्‍या चालवून किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे आम्ही पैसे खाल्ले नाही. 
- पराग संधान, अध्यक्ष, अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्स्पोर्ट 

 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख