As a result of the sale of alcohol, the woman took poison with her two children | Sarkarnama

तळीरामाचा धिंगाणा ! पतीकडून छळ झाल्याने महिलेने दोन मुलांसह घेतले विष

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 6 मे 2020

केडगाव येथील रिक्षाचालक मंगळवारी रात्री दारू पिऊन घरी गेला. त्यातून पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद आज सकाळपर्यंत चालला होता. अखेर संतापलेल्या पत्नीने दहा वर्षांचा मुलगा व लहान मुलीस विष पाजून स्वत:ही विष सेवन केले. 

नगर : दारुविक्रीला परवानगी दिल्याचा परिणाम लगेचच दिसून आला. आज केडगाव उपनगरातील एकनाथनगर येथे दुपारी दोन मुलांसह त्यांच्या आईने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मद्यपान करून आलेल्या पतीसोबत झालेल्या वादातून महिलेने विष प्राशन केल्याचे समजते. माय-लेकरांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
एकनाथनगर (केडगाव) येथील रिक्षाचालक काल (मंगळवारी) रात्री दारू पिऊन घरी गेला. त्यातून पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद आज सकाळपर्यंत चालला होता. अखेर संतापलेल्या पत्नीने दहा वर्षांचा मुलगा व लहान मुलीस विष पाजून स्वत:ही विष सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. नागरिकांनी त्यांना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. याबाबत माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पीडित महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
 
दारु विक्री बंद करावी
दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकार केवळ महसूल मिळविण्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या जिवाशी खेळत आहे. लाॅक डाऊन उठेपर्यंत दारूला परवानगी देणे योग्य नव्हते. लोक दारू पिवून घरात बसतात. घरच्या मंडळींना त्रास देतात. इतर वेळी हे तळीराम पिवून बाहेरच पडतात. त्यामुळे किमान महिलांना त्रास तरी होत नाही. त्यामुळे सरकारने किमान लाॅक डाऊनच्या काळात दारु विक्री पूर्णपणे बंद करावी, अशी मागणी आता परिसरातून होत आहे.

हेही वाचा...

स्कूल बसमधून दारूविक्री 

नगर ते कापूरवाडी रस्त्यावरील नागरदेवळे फाटा येथे स्कूल बसमधून दारूविक्री करताना भिंगार कॅम्प पोलिसांनी एकास पकडले. संजय एकनाथ लोणारे (रा. कापूरवाडी, ता. नगर) असे त्याचे नाव आहे. 
नगर-कापूरवाडी रस्त्यावर स्कूल बसमधून एक जण दारूविक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, भिंगार कॅम्प पोलिसांनी सापळा रचला. नागरदेवळे वेशीजवळ स्कूल बसमधून दारूविक्री करताना संजय लोणारे यास पकडले. झडतीत त्याच्याकडे 4680 रुपयांची दारू आढळून आली. पोलिसांनी दारूसह एक लाख 54 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे, पोलिस कर्मचारी राजेंद्र सुद्रिक, पोलिस कॉन्स्टेबल सचिन धोंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

तळीरामांनी केली लुटालूट 
राहुरी : नगर-मनमाड महामार्गावर गुहा गावाजवळ बिअरचे बॉक्‍स घेऊन जाणारा टेम्पो आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उलटून बिअरच्या शेकडो बाटल्या रस्त्यावर फुटून, कॅन रस्त्यावर विखुरले. पोलिस येईपर्यंत अनेकांनी बिअरच्या बाटल्या व कॅन लांबविले. लॉकडाउनमुळे दीड महिन्यापासून दारूच्या थेंबासाठी आसुसलेल्या तळीरामांची चंगळ झाली. या अपघातात टेम्पोचालक व क्‍लीनर किरकोळ जखमी झाले. 
नगरहून बिअरचे बॉक्‍स घेऊन टेम्पो (एमएच 17 बीवाय 3518) शिर्डीला जात होता. गुहा ते चिंचोलीदरम्यान मागील टायर फुटल्याने टेम्पो उलटला. टेम्पोतून बिअरचे बॉक्‍स रस्त्यावर पडले. बिअरच्या शेकडो बाटल्या फुटल्या. त्यामुळे रस्त्यावर बिअरचा सडा पडला. टेम्पोचालक राजेंद्र सीताराम गाडेकर व क्‍लीनर गणेश अशोक धनवटे किरकोळ जखमी झाले. सहायक पोलिस निरीक्षक यशवंत राक्षे व उपनिरीक्षक गणेश शेळके तातडीने पथकासह घटनास्थळी पोचले; परंतु तोपर्यंत रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांनी, तसेच आसपासच्या काही जणांनी बिअरच्या बाटल्या व कॅन पळविले. 
अपघातामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांग लागली होती. पोलिसांनी रस्त्यावर इतस्ततः पसरलेल्या बाटल्या व कॅन बाजूला करून, क्रेनच्या साह्याने टेम्पो उभा केला. एका तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख