श्रीरामपूरमध्ये जनता कर्फ्यूला प्रतिसाद ; लाॅकडाउनचा फैसला सोमवारी - Response to public curfew in Shrirampur; Lockdown decision tomorrow | Politics Marathi News - Sarkarnama

श्रीरामपूरमध्ये जनता कर्फ्यूला प्रतिसाद ; लाॅकडाउनचा फैसला सोमवारी

गाैरव साळुंके
रविवार, 13 सप्टेंबर 2020

गेल्या चार महिन्यांपासून शहरात दर रविवारी स्वतःहून जनता कर्फ्यू पाळला जातो. त्यात काही दुकाने खुली असतात. नेहमीच्या जनता कर्फ्यूपेक्षा आज दिवसभर शुकशुकाट पहायला मिळाला.

श्रीरामपूर : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वपक्षीयाच्या वतीने आजपासून पुढील आठ दिवस लाॅकडाउन पाळण्याचे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केल्याने आज शहरात सर्वत्र जनताकर्फ्यूचे पालन करण्यात आले.

मुख्य बाजारपेठेसह शिवाजी रस्ता, मुख्य रस्ता, संगमनेर रस्ता, नेवासे रस्त्यासह गोंधवणी रस्त्यावरील दुकाने दिवसभर बंद होती. फळेविक्रेत्यांसह तुरळक व्यावसायिक वगळता प्रमुख बाजारपेठेत कडकडीत बंद होता. मात्र गेल्या चार महिन्यांपासून शहरात दर रविवारी स्वतःहून जनता कर्फ्यू पाळला जातो. त्यात काही दुकाने खुली असतात. नेहमीच्या जनता कर्फ्यूपेक्षा आज दिवसभर शुकशुकाट पहायला मिळाला. 

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शहरात लाॅकडाउन करण्याबाबत अनेकांचे वेगवेगळी मते आहेत. त्यासाठी पालिकेत दोन वेळा झालेल्या बैठकीत लाॅकडाउनचा निर्णय सर्वानुमते झाला. लाॅकडाउनला माजी आमदारांसह विद्यमान आमदार आणि काहीं संघटनांनी विरोध दर्शविला. त्यामुळे नेहमीप्रमाणे आज रविवारी जनता कर्फ्यू असल्याने जनता कर्फ्यू पाळला. परंतू आठ दिवसांच्या लाॅकडाउनबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. लाॅकडाउचा निर्णय आता व्यापारी आणि नागरिकांच्या हातात आहे. सार्वजनिक स्वच्छतेसह आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. राजकारण बाजूला ठेवुन कोविड उपचार सुविधा वाढवून रुग्णांना चांगले उपचार देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

देशभरात सध्या अनलाॅक प्रक्रिया लागू असून, नागरिकांनी नियमांचे पालन करुन कोरोना संसर्गापासून वाचण्याचे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले. सध्या शहरातील अनेक ठिकाणी विनाकारण गर्दी होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतो. कोरोनामुळे अनेकांचे मृत्यू झाले, तरी नागरिकांनी अद्याप गांभिर्य कळाले नाही. राज्यात सध्या १८८ कलम लागू असून, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास मनाई आहे. पोलिस यंत्रणा अनेकदा बघ्याची भुमिका घेते. नियमांचे उल्लघंन झाल्यास कारवाई होत नाही. कोरोनाच्या लढाई विरुद्ध नागरिकांनी प्रबोधन करण्यात पोलिस यंत्रणेसह आरोग्य विभाग अपयशी ठरल्याचे दिसते.

नियमांचे उल्लघंन झाल्यास पालिकेकडुन दंडात्मक कारवाई होत नसल्याने कोरोनाचा धोका वाढला. पालिकेच्या भरारी पथकांनी केलेल्या कारवाईमुळे प्रबोधन झाल्याचे अद्याप दिसत नाही. आता रुग्ण वाढल्याने लाॅकडाउन करण्याची वेळ ओढावली आणि राजकारण तापले. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. उद्या सकाळी शहरातील परिस्थिती पाहुन लाॅकडाउनचा संभ्रम दुर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख