प्रजासत्ताकदिनी फेस्टिव्हल ! आमदार तांबे, अधिकाऱ्यांनी यांनी मारला चिकनवर ताव - Republic Day Festival! MLA Tambe, officials hit fever on chicken | Politics Marathi News - Sarkarnama

प्रजासत्ताकदिनी फेस्टिव्हल ! आमदार तांबे, अधिकाऱ्यांनी यांनी मारला चिकनवर ताव

आनंद गायकवाड
बुधवार, 27 जानेवारी 2021

चिकन व अंडी 70 अंश सेल्सिअस तापमानात उकळून घेतल्यास त्यातील विषाणू नष्ट होतात. मागील काही दिवसांपासून केंद्र व राज्य सरकार याबाबत मोठ्या प्रमाणात जगजागृती मोहीम राबवीत आहे.

संगमनेर : सध्या "बर्ड फ्लू'बाबतच्या अफवांना ऊत आला आहे. याचा थेट परिणाम राज्यातील पोल्ट्री व्यवसायावर झाला आहे. या अफवांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. याअंतर्गत मंगळवारी (ता. 26) प्रजासत्ताकदिनी संगमनेर तालुका "बर्ड फ्लू' समन्वय समितीतर्फे "चिकन फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे आदींसह उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चिकनच्या विविध पदार्थांवर मनसोक्‍त ताव मारला. 

चिकन व अंडी 70 अंश सेल्सिअस तापमानात उकळून घेतल्यास त्यातील विषाणू नष्ट होतात. मागील काही दिवसांपासून केंद्र व राज्य सरकार याबाबत मोठ्या प्रमाणात जगजागृती मोहीम राबवीत आहे. चिकन खाल्ल्याने "बर्ड फ्लू' होत नाही, असा स्पष्ट संदेश समाजात जाऊन, खवय्यांच्या मनातील अकारण भीती नष्ट व्हावी, हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागील हेतू होता. याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलिस निरीक्षक अभय परमार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, भूमिअभिलेखचे उपअधीक्षक नितीन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रशांत पोखरकर, अमृत चिक्‍सचे नामदेव काशीद यांनी परिश्रम घेतले. 

 

हेही वाचा..

कोविड योद्‌ध्यांचा संगमनेरमध्ये सत्कार 

संगमनेर : जागतिक कोविड महामारीच्या साथीदरम्यान, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठेने कर्तव्य बजावणाऱ्या कोविड योद्‌ध्यांचा, प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून, संगमनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

संगमनेर शहर व तालुक्‍यातील सर्व शासकीय- निमशासकीय वैद्यकीय अधिकारी, तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिक, महसूल प्रशासन, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, पोलिस यंत्रणा, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी, हिवताप कर्मचारी व "108' रुग्णवाहिकेचे चालक, वैद्यकीय अधिकारी यांनी कोविड महामारीच्या काळात दिवस-रात्र कर्तव्य, जबाबदारी अत्यंत निष्ठेने बजावली होती. प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला. 
घुलेवाडी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते व दानशूर मंडळींचाही या वेळी सत्कार करण्यात आला. दरम्यान, याची चर्चा महाराष्ट्रात होत आहे.

या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, डॉ. हर्शल तांबे, संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, वैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर भवर, डॉ. संदीप कचेरिया, डॉ. सीमा घोगरे आदी उपस्थित होते. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख