नगर शहरातील दोघांचे अहवाल पाॅझिटिव्ह - The report of both of them in the nagar is positive | Politics Marathi News - Sarkarnama

नगर शहरातील दोघांचे अहवाल पाॅझिटिव्ह

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 मे 2020

पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडून १९ जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात हे दोघे बाधित आढळून आले, तर उर्वरित १७ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

नगर : नगर शहरातील शांतीनगर येथे दोन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित आढळून आलेल्या ड्रायव्हरची २२ वर्षीय मुलगी आणि सुभेदार गल्ली येथील वृद्ध महिलेच्या संपर्कातील २० वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे आज अहवालावरून स्पष्ट झाले आहे. दोघे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ६२ झाली आहे.

आज सायंकाळी पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडून १९ जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात हे दोघे बाधित आढळून आले, तर उर्वरित १७ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बाधित तरुणीच्या वडिलांचा १३ मे रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच्या संपर्कातील इतर व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात या व्यक्तीच्या मुलीलाच कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.

याशिवाय, नगर शहरातील सुभेदार गल्ली येथील एक वृद्ध महिला दोन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित आढळून आली होती. याच गल्लीत राहणाऱ्या एका युवकाचा अहवालही आज पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीचा दोन दिवसांपू्वीच स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, प्रयोगशाळेने ते रिजेक्ट केल्याने काल पुन्हा पाठविण्यात आले होते. 

आतापर्यंत एकूण १८१९ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १६९९ स्त्राव निगेटिव्ह आले, तर ६२ व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले. याशिवाय काल परजिल्ह्यातील एक महिलाही बाधीत असल्याचे निष्पन्न झाले होते. आता ४० व्यक्ती बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत.

हेही वाचा...

पुण्यातून विनापरवाना आल्याने गुन्हा दाखल 

श्रीगोंदे : कोरोनाचा संसर्ग सुरू असताना, कुठलाही परवाना न घेता श्रीगोंद्यातील भानगाव येथे पुण्याहून बेकायदेशीररीत्या आलेल्या व्यक्तीविरुद्ध आज पोलिसांनी स्वतःहून फिर्याद देत गुन्हा दाखल केला. 

भाऊसाहेब शिवाजी पवार (वय 32, रा. भानगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. जिल्हाबंदीचा आदेश असताना पवार हा पुणे ते भानगावदरम्यान छुप्या मार्गाने विनापरवाना प्रवास करून आला. प्रवासासाठी प्रशासनाची परवानगी न घेता तो नगर जिल्ह्यात आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोरोनाबाबत सर्व बाबी माहीत असूनही त्याने बेकायदेशीरपणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख