नगर : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्या तथा यशस्विनी ब्रिगेडच्या संस्थापक रेखा भाऊसाहेब जरे यांच्या दोन मारेकऱ्यांसह तिघांना पोलिसांनी अटक केली होती. आता आणखी दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, एकूण पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
कालपर्यंत ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (रा. श्रीरामपूर) व फिरोज राजू शेख (रा. राहुरी) या दोन मारेकऱ्यांसह आदित्य सुधाकर चोळके (रा. कोल्हार, ता. राहाता) या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायायलाने 7 दिवसांपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. या कटाचा संशयित सूत्रधार म्हणून सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना पारनेरच्या न्यायालयापुढे नेण्यात येणार आहे.
रेखा जरे यांची सोमवारी रात्री जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. त्या पुण्याहून नगरकडे येत होत्या. त्यांच्या गाडीला कट मारल्याच्या कारणावरून किरकोळ बाचाबाची करीत मारेकऱ्यांनी त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले होते. त्यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यानच्या काळात जरे यांच्या कारसमोर उभ्या असलेल्या आरोपीचे छायाचित्र जरे यांच्या मुलाने मोबाईलवर टिपले होते. ते पोलिसांना हाती आल्यामुळे आरोपींचा शोध तातडीने लागण्यास मदत झाली. केवळ 24 तासांच्या आतच दोन्ही मारेकऱ्यांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्या सांगण्यावरून इतर दोघांना पकडण्यात आले असून, मास्टरमाईंड अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
दरम्यान, या घटनेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात या घटनेची चर्चा सुरू आहे. ही हत्या नेमका कोणत्या कारणाने झाली, याबाबत पोलिस तपास करीत असून, संबंधितांचे काॅल डिटेल्सवरून बरीचशी माहिती हाती लागणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

