नगर : आदर्शगाव हिवरेबाजारला भेट देत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गावातील उपक्रमांची माहिती घेतली. आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्याशी चर्चा करून मार्गदर्शन केले. सध्या हिवरेबाजारला सुरू असलेल्या संविधान पारायणात सहभाग घेवून त्यांनीही वाचन केले.
मुश्रीफ यांच्या हस्ते कृषी वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले. जलपूजनही करण्यात आले. सध्या हिवरे बाजारमध्ये भारतीय संविधानाचे पारायण (वाचन) चालू आहे. या वेळी मुश्रीफ यांनी संविधानाचे वाचन करून हिवरे बाजारच्या अभियानात सहभाग घेतला.
या वेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले, संपूर्ण शिवार पाहणीनंतर हिवरे बाजार गावाचे ग्रामपंचायतच्या माध्यमातून व लोकसहभागातून सरकारच्या विविध योजनांचे प्रभावीपणे नियोजन पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केले. म्हणूनच आज हे गाव सर्वार्थाने स्वयंपूर्ण आदर्श गाव आहे. या पद्धतीने प्रत्येक गावाने आपल्या गरजा ओळखून शासकीय योजनांचा व्यवस्थित उपयोग करून घेतल्यास प्रत्येक गाव स्वयंपूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतच्या सुधारणेसाठी नवीन समिती करून ग्रामविकासाबाबत काही सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी काही धोरणे बदलावी लागली तरी चालेल. आदर्श गाव हिवरे बाजार देशाला ग्रामविकासाची दिशा देणारे गाव आहे.
हिवरेबाजारने राज्यालाच नव्हे, तर दिशाला दिशा दिली आहे. गावातील पाणलोटाचे कामे विशेष आहेत. पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी केलेले प्रयत्न येथे पाहण्यास मिळतात. शिवाय कुऱ्हाडबंदी, चाराबंदी आदी उपक्रमांमुळे गावात झालेले बदल काैतुकास्पद आहेत. ही पाहणी करून मुश्रीफ यांनी पवार यांचे काैतुक केले.

