या कारणाने अकोले तालुक्यातील वारकरी राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहणार - For this reason, Maharaj in Akole taluka will stay away from political events | Politics Marathi News - Sarkarnama

या कारणाने अकोले तालुक्यातील वारकरी राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहणार

शांताराम काळे
शनिवार, 11 जुलै 2020

हे काय चालले, असे म्हणत वारकरी संप्रदायचे दीपक देशमुख महाराज व सर्वच वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. आता यापुढे राजकीय कार्यक्रमांना जायचेच नाही, असे ठरवून या मंडळींनी आपले कीर्तन, भजनच बरे असा ठाम निर्णय घेतला.

अकोले : पिंपळगाव खांड येथे आज आमदार डाॅ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड पिचड यांच्यावर नाराज असलेल्या तिसऱ्या आघाडीने जलपूजनाचे आयोजन केले. यासाठी काही महाराजांना बोलावण्यात आले. जलपूजनाचा कार्यक्रमही झाला, मात्र आपल्या मनातील खदखद बाहेर काढण्यासाठी दोन्ही नेत्यांवर जोरदार आरोप- प्रत्यारोप झाले. राजकीय आखाडाच रंगला. हे काय चालले, असे म्हणत वारकरी संप्रदायचे दीपक देशमुख महाराज व सर्वच वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. आता यापुढे राजकीय कार्यक्रमांना जायचेच नाही, असे ठरवून या मंडळींनी आपले कीर्तन, भजनच बरे असा ठाम निर्णय घेतला.

अकोले तालुक्यातील ६०० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या जलाशयाचे पूजन ग्रामस्थांच्या आग्रहावरून माजी मंत्री मधुकर पिचड, सीताराम गायकर, वैभव पिचड, शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले व या जलाशयाला योगदान दिलेल्या व्यक्तींच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी आमदार डाॅ. किरण लहामटे , अशोक भांगरे यांनी जलपूजन केले. त्यावेळी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख, मीननाथ पांडे यांना, तर शिवसेनेचे बाजीराव दराडे, मारुती मेंगाळ यांना आमंत्रित करण्यात आले नाही. ही जाणीव झाल्याने व त्याचे उट्टे काढण्यासाठी हे सर्वजण एकत्र येऊन त्यांनी जलपूजनाचे नियोजन केले. त्यात वारकरी संप्रदायातील महाराजांना निमंत्रण देण्यात आले. काही स्थानिक लोक प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. 

जलपूजन झाल्यानंतर आपल्या मनातील खदखद बाहेर काढत रमेश देशमुख यांनी माजी आमदार वैभव पिचड यांच्यावर नाराजी व्यक्त करत आमचा वापर केला, जिल्हा परिषदेत डावलले, जलपूजनाला बोलविले नाही, तर शिवसेनेचे बाजीराव दराडे यांनी आमदार किरण लहामटे यांनी युतीचा धर्म पाळावा, हवेत नाही तर जमिनीवर यावे, असे विचार मांडले. असेच मीननाथ पांडे, मेंगाळ यांनीही भाषण केले. तो प्रकार पाहून वारकरी संप्रदायातील लोक मात्र नाराज झाले. हे काय चालले, कार्यक्रम कोणता, हे बोलतात काय, त्यात आपण अग्रभागी, या सर्व बाबींची दखल घेत महाराज मंडळी बाहेर पडले व नंतर लगेचच माध्यमांशी बोलताना आपली नाराजी व्यक्त केली. या वेळी विश्वनाथ शेटे, दीपक देशमुख, किरण शेटे, अरूण भोर, रमेश भोर आदी महाराज मंडळी उपस्थित होती.

राष्ट्रवादी, भाजप तसेच इतर पक्षातील कार्यकर्त्यांव्यतिरिक्त आता नवी आघाडीने तालुक्यात डोके वर काढल्याने आगामी काळात राजकारण अधिक पेटत जाईल, त्यामुळे आपण त्यांच्यापासून दूर रहावे, असा निर्णय उपस्थित महाराजांी घेतला.

आमचा राजकीय कार्यक्रमांशी संबंध नाही

वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत तेथून पाय काढला. आम्ही केवळ जलपूजनाला आलो आहोत, त्यातून कुणी राजकीय आखाडा बनवून आमच्या त्याच्याशी सूतराम संबंध नसताना आमचा वापर करीत असेल, तर ते आम्हाला कदापिही मान्य नाही. आम्ही कोणत्याही पक्षाचे अथवा गट तटाचे नसून परमेश्वराचे नामस्मरण, प्रबोधन करणे व सामाजिक कामात सहभागी होणे, हे काम आहे. ते अविरतपणे सुरु राहील. गलिच्छ राजकारणात पडण्याचा आमचा हेतू नाही व आमचा संबंध जोडू नये, असे दीपक महाराज देशमुख यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख