या प्रश्नासाठी प्रताप ढाकणे यांचे आरोग्यमंत्र्यांना साकडे - For this reason, Adv. Pratap Dhakne to the Health Minister | Politics Marathi News - Sarkarnama

या प्रश्नासाठी प्रताप ढाकणे यांचे आरोग्यमंत्र्यांना साकडे

राजेंद्र सावंत
शुक्रवार, 17 जुलै 2020

पाथर्डीत कोरोनाचा रुग्ण आढळलेला भाग दाटिवाटीचा आहे. शहरातील कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. लॉकडाउन केले जाते; मात्र त्याची अंमलबजावणी कडक होताना दिसत नाही.

नगर : पाथर्डी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. याबाबत ग्रामस्थ मात्र काळजी घेताना दिसत नाहीत. तीच स्थिती आरोग्य यंत्रणेची आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणाही याबाबत विशेष काहीच दखल घेत नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन पाठविले आहे.

पाथर्डीतील कोरोना प्रसाराची स्थिती हाताबाहेर जात आहे. रुग्ण आढळलेल्या परिसरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी व रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वॅब चाचण्या करून विलगीकरणाची व्यवस्था करावी लागेल. मात्र, यासाठी स्थानिक आरोग्य यंत्रणेने कोणतीही काळजी घेतलेली नाही. पाथर्डीत कोरोनाचा रुग्ण आढळलेला भाग दाटिवाटीचा आहे. शहरातील कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. लॉकडाउन केले जाते; मात्र त्याची अंमलबजावणी कडक होताना दिसत नाही. हा पूर्वीचा अनुभव आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे विलगीकरण तातडीने होणे गरजेचे असताना त्या व्यक्ती इतरत्र फिरताना दिसत आहेत, असे ढाकणे यांनी म्हटले आहे.

अहवालांना उशिर का

ज्यांचे स्राव तपासणीला पाठविले आहेत, त्यांचा अहवाल चोवीस तासांत आला पाहिजे. चार ते पाच दिवस अहवाल येण्यास लागले, तर त्या व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येत असल्याने कोरोनाची साखळी तुटणार नाही. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य सूचना मंत्र्यांनी द्याव्यात, अशी मागणी ढाकणे यांनी टोपे यांच्याकडे केली आहे. 

तीन जिल्ह्यांशी संबंध

पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक ऊसतोडणी कामगार आहेत. सध्या बहुतेक लोक गावाकडे आहेत. लाॅकडाऊनच्या परिस्थितीमुळे त्यांना जेवणाची भ्रांत आहे. असे असताना कोरोनाने तालुक्याला विळखा घातला, तर अनेक गरीब लोक त्यामध्यो होरपळणार असल्याची भिती आहे. बीड, औरंगाबाद व नगर शहराशी संबंधित असलेल्या पाथर्डी शहरात बाहेरील जिल्हयातून येणाऱ्या लोकांची भिती जास्त आहे. त्यामुळे या तालुक्यात विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे मत सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख